दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । मुंबई । शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समाजात समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकामुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते.
राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव शिक्षकाकडून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून ऑनलाइन मागविण्यात येतात. अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचना निकषानुसार जिल्हास्तरावर जिल्हा निवड समिती प्रस्तावाचे छाननी करून प्रवर्गनिहाय पात्र प्रस्ताव शिक्षण संचालक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या राज्य निवड समितीकडे पाठवीते. सदर शिफारशीवर शिक्षकांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड करून राज्य निवड समितीकडून शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येतात. पुरस्कार सर्वसाधारणपणे १५ ऑगस्ट रोजी जाहीर करून त्याचे प्रत्यक्ष वितरण ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाला सन्माननीय व्यक्तीच्या हस्ते करण्यात येते.