वन विभागाच्या त्या जागांवर सोलर पार्क उभारा; वनमंत्री गणेश नाईक यांचे साताऱ्यात निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2025 | महाबळेश्वर | वन विभागाच्या ज्या जमिनीवर झाडे उगवत नाहीत अशा जागांवर सोलर पार्क उभे करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. प्रत्येक वन परिक्षेत्रात सुरंगी, बकुळी, बेल, मोह, भाडोळी जांभूळ या रोपांची लागवड करण्यावर प्राधान्य द्यावे. याचबरोबर सीजनल फळे व रीजनल फळांच्या रोपांच्या लागवडीवर भर देण्यात यावा. जंगलातील वनसंपदा वनवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करावा, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा सभागृहात वनविभागातील योजनांचा व उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री श्री. नाईक अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पुणे सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक पंकज गर्ग, सातारच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, कोयना वन्यजीव प्रकल्पचे उपसंचालक किरण जगताप, सामाजिक वनीकरण सातारचे विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, वन विकास महामंडळ पुणे येथील विभागीय वन अधिकारी सारिका जगताप, चांदोली वनजीव विभागाच्या उपसंचालक स्नेहलता पाटील आदी वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वन विभागातील सर्व रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून वनमंत्री श्री. नाईक म्हणाले, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी तणाव मुक्त, आनंददायी वातावरणात काम करून वन विभागाचे बळकटीकरण करावे. वन विभागाच्या जुन्या व नादुरुस्त वाहनांची यादी करावी. अशा वाहनांचे विहित पद्धतीने निर्लेखन करावे. जंगलात फिरतीवर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मजबूत बनावटीची वाहने खरेदी केली जातील.

राज्यभर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उल्लेखनीय काम करीत असून या कामांची लोकांना माहिती व्हावी यासाठी मासिक सुरू करण्यात येईल. वनविभागाच्या अखत्यारित येणारी विश्रामगृहांची स्थिती चांगली ठेवावी. सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर द्यावा. आनंददायी जीवन जगण्यासाठी विभागांतर्गत क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी सामूहिक वैद्यकीय विमा काढावा. कर्मचाऱ्यांच्या अडचणीवर मार्ग काढला जाईल. कुटुंबाची गैरसोय होणार नाही होईल अशा पद्धतीने बदल्यांचा निर्णय घेण्यात येईल, असेही वनमंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.

यावेळी उपवन संरक्षक आदिती भारद्वाज यांनी सातारा जिल्ह्याच्या अखत्यारीत येणाऱ्या वन विभागाच्या कामांची व उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये वड महोत्सव, वन पर्यटन, त्रिपक्षीय करार, ग्रीन क्रेडिट प्रोग्रॅम, कास पठार इको टुरिझम, संयुक्त वन व्यवस्थापन समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची व प्रस्तावित कामांची माहिती दिली.

कोयना वन्यजीव प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व कोयना अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात राबवण्यात येणाऱ्या वन्यप्राण्यांची संरक्षण, पेट्रोलिंग, जीआयएस मॅपिंग, टायगर सेल, कॅमेरा ट्रॅपिंग, वाघांच्या व तृणभक्षक प्राण्यांच्या हालचालीची माहिती, वाघांची संख्या वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, वन्यजीव सप्ताह जनजागृती, वाल्मिकी पठार, सह्याद्री निसर्ग पर्यटन कृती आराखड्यासंदर्भात सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

सामाजिक वनीकरण साताराचे विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांनी सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत वृक्ष लागवड, रोपवाटिकेतील विविध प्रजातींच्या रोपांच्या निर्मिती व विक्री, अभिसरण योजना, कन्या वन समृद्धी योजना, बांबू रायझोम निर्मितीद्वारे बांबू लागवडीची स्थिती, शेतकरी कार्यशाळा, वृक्षदिंडी आदी उपक्रमाविषयी माहिती दिली.

वन विकास महामंडळ पुणे सारिका जगताप यांनी वन विकास महामंडळ द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या विषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!