
स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑगस्ट : ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद मेहता यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने फलटणच्या राजकारणात एका मोठ्या आणि अनपेक्षित राजकीय घटनेची नांदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे, विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोघेही या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
बुधवार, दि. ३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, हे दोन्ही नेते केवळ उपस्थितच राहणार नसून, ते एकत्रितपणे श्री. अरविंद मेहता यांचा सत्कार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा सत्कार सोहळा केवळ सामाजिक न राहता, त्याला एक मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
फलटणच्या राजकारणाचा इतिहास पाहता, अशा प्रकारचे मनोमिलन किंवा राजकीय युत्या नवीन नाहीत. यापूर्वी, लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे मनोमिलन फलटणकरांनी अनुभवले आहे. तसेच, काही निवडणुकांमध्ये माजी आमदार स्व. चिमणराव कदम आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची युतीही पाहिली आहे.
त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, या दोन दिग्गज नेत्यांचे एकाच व्यासपीठावर येणे, हे भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांचे संकेत आहेत का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.