
सातारा – विश्वास पाटील यांचा जाहीर सत्कार करताना डॉ. राजा दीक्षित, अण्णा बनसोडे, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, विनोद कुलकर्णी, भगवान वैराट, नंदकुमार सावंत आदी.
स्थैर्य, सातारा, दि. 13 सप्टेंबर : मी सातार्याच्या भूमीतून मोठा झालो आहे. सातार्याची माती मला पंढरीच्या बुक्क्यापेक्षाही महनीय आहे. मला इतिहासकार, गुरू किंवा ग्रंथाने इतिहास शिकवलेला नसून महाराष्ट्राच्या मातीतून, दर्याखोर्यातून अथकपणे प्रवास करत स्थानिकांच्या भेटीगाठीतून त्यांनी दिलेल्या माहितीतून मी इतिहास शिकलो आहे. माझे इमान शब्दांशी आणि महाराष्ट्राच्या भूमीशी आहे. दहा हजार पाने लिहिणार्या माझ्यासारख्या लेखकाच्या साहित्यसंपदेतील एकही परिच्छेद चोरीचा आहे, असे सिध्द झाल्यास मी त्या क्षणी लेखणी सोडेन, असे प्रतिआव्हान सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सोमवारी दिले. सातारच्या थोरल्या शाहू महाराजांची कर्तृत्व कहाणी वेगळ्या पध्दतीने मांडण्याचा मानस असल्याचेही त्यांनी याप्रसंगी जाहीर केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाहूपुरी शाखा, सातारा आणि मावळा फौंडेशनतर्फे जानेवारी 2026 मध्ये सातारा येथे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा या निमित्ताने सोमवारी (दि.22) शाहू कलामंदिर येथे जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना पाटील बोलत होते. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते पाटील यांना गौरवण्यात आले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्याचे पर्यटन व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शाल, सन्मानपत्र, संमेलनाचे बोधचिन्ह, पुष्पगुच्छ आणि सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून विश्वास पाटील यांचा गौरव करण्यात आला.
न्याय देवता माझ्या लिखाणाकडे जागकरूकतेने लक्ष देऊन असल्याने माझे लिखाण योग्य पध्दतीनेच केले जाईल या विधानाचा पुनरुच्चार करून विश्वास पाटील म्हणाले, मला कधी ना कधी तरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे होते. देशात कुठेही झालेल्या संमेलनाध्यक्षापेक्षा सातारा येथे होणार्या संमेलनाचा अध्यक्ष झालो याचा मला मनस्वी आनंद आहे.
सातार्याच्या शाहू महाराज यांचे कर्तृत्व मोठे आहे. त्यांचे स्वतंत्र मंत्रिमंडळ होते. त्याच्या शिफारसीनेच पेशवे यांना पंतप्रधानपद दिले गेले. या इतिहासाचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. नव्या वाचकांपुढे सत्यता आणताना पानिपतपर्यंतची पेशवाई आणि उत्तर पेशवाई याविषयी प्रकाश टाकला गेला पाहिजे, असे पाटील म्हणाले. आजच्या काळात ग्रंथालयांची अवस्था दयनीय आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रंथपालांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. सातारा येथे होणार्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रंथपरंपरा जपली जावी आणि ग्रंथदेवतेची पूजा व्हावी, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. माझ्या उमेदीच्या काळात मला सर्व क्षेत्रातील महनीय व्यक्तींचा सहवास लाभला. प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तर आजच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याने मी प्रशासकीय व साहित्यसेवा निष्ठेने करू शकलो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही विश्वास पाटील यांनी दिली.
डॉ. राजा दीक्षित म्हणाले, इतिहास आणि साहित्य या अत्यंत जवळच्या गोष्टी आहेत. त्यांचा मनोज्ञ संगम पाटील यांच्या साहित्यकृतीतून प्रकर्षाने दिसून येतो. इतिहास केवळ काय घडले एवढेच सांगत नाही तर काय घडू शकते याच्या शक्यताही दर्शवित असल्याने यात कल्पनाशक्तीलाही मोठा वाव असतो. विश्वास पाटील यांच्या साहित्यकृतीतून घेतलेला इतिहासाचा वेध अर्थपूर्ण आहे. त्यांनी इतिहासासह विविध सामाजिक घटनांचे कलात्मक आणि सत्यदर्शन देखील त्यांच्या साहित्यातून घडविले आहे. त्यांचे लिखाण नुसते अभ्यास आणि वाचनातून प्रकटलेले नसून क्षेत्रभेटी आणि भूगोलाचा अभ्यास करून त्यांनी इतिहास मांडला आहे.
अण्णा बनसोडे म्हणाले, विश्वास पाटील यांचे साहित्य फक्त इतिहासापुरते मर्यादित नसून त्यांनी चौफेर लेखन केले आहे. त्यांनी आपल्या लिखाणातून अनेक दुर्लक्षित प्रश्नांना वाचा फोडत व्यथा मांडली आहे. ऐतिहासिक सातारा शहरातील संमेलनाच्या अध्यक्षपदी इतिहास लिहिणार्या लेखकाची निवड होणे ही आनंददायक गोष्ट आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याला मोठी परंपरा लाभलेली असून एखादा कार्यक्रम अथवा उपक्रम हाती घेतला की, सर्व मिळून तो यशस्वी करून दाखवतात. सातारा येथे होणारे 99वे संमेलन यशस्वी करणे ही जिल्ह्यातील चारही मंत्री तसेच विधानसभा सदस्यांची जबाबदारी आहे. संमेलन नेटके, उत्तम करण्यासाठी जिल्ह्यात पूर्ण प्रशसनासह सर्व प्रतिनिधी ताकदीने उभे राहतील.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, अवघ्या शंभर दिवसांवर येऊन ठेपलेल्या साहित्यसंमेलनामुळे सातारकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या दृष्टीने आनंदाचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. थोरामोठ्यांचे विचारमंथन ऐकायला जिल्ह्यातील साहित्यिक, रसिक उत्सुक आहेत. हे संमेलन फक्त ठराविक व्यक्तींचे अथवा संस्थांचे नाही तर सर्व सातारकरांचे आहे आणि ते अविस्मरणीय करणे हे सातारकरांचे प्रथम कर्तव्य आहे. सातार्याचे थोरले शाहू महाराज यांचा इतिहास, कार्य झाकोळले गेले आहे. विश्वास पाटील यांनी आपल्या समर्थ लेखणीतून हा वैभवशाली इतिहास जगासमोर आणावा ही सातारकरांची हक्काची मागणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले. भगवान वैराट यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या मंचावर केले. हा धागा पकडून छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, या मागणीला सातारकरांचा पूर्ण पाठींबा राहील.
छत्रपती उदयनराजे भोसले यांचा शुभेच्छा संदेश याप्रसंगी वाचून दाखविण्यात आला. सातारच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पानिपतकार विश्वास पाटील यांची संमेलनाध्यक्षपदी निवड होणे हा दुग्धशर्करा योग आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हावासियांची जबाबदारी वाढली आहे. ते कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्व उपक्रमाला मोठ्या प्रमाणात सहाय्य करतील असा विश्वास आहे, असे त्यांनी शुभेच्छा संदेशात सांगितले.
विनोद कुलकर्णी म्हणाले, वस्तुनिष्ठ इतिहास मांडण्याचे कार्य विश्वास पाटील यांच्या लेखणीने केले आहे. त्यांच्या पानिपतचे गारुड आजही कमी झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी भाषा टिकली पाहिजे हा वारसा छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढे नेला आहे. त्यांच्या पाठींब्यामुळेच हे संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येत आहे. थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकण्याचे कार्य विश्वास पाटील यांनी करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास प्रा. अजिंक्य सगरे, किशोर बेडकिहाळ, सुनील काटकर, राजूभैय्या भोसले, विक्रम पाटील, अनिल जठार, अजित साळुंखे, राजेंद्र पाटील, तुषार महामुलकर, सचिन सावंत, शिरीष चिटणीस, डॉ. राजेंद्र माने, यशवंत पाटणे, प्रकाश गवळी, अमोल मोहिते, डॉ. चित्रलेखा माने-कदम, हरिष पाटणे, डॉ. संदीप श्रोत्री, सतिष घोरपडे, वजीर नदाफ, संपत जाधव, अमर बेंद्रे, अमित कुलकर्णी मंचावर होते. नंदकुमार सावंत, विनोद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नंदकुमार सावंत यांनी मानपत्राचे वाचन केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. चंद्रकांत बेबले यांनी आभार मानले.
मार्चनंतर ’अॅडजस्टमेंट’ करू
सातारचे साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी पालकांचा हातभार लागणे आवश्यक आहे. त्यामुळेच सातारच्या पालकमंत्र्यांनी सढळ हाताने मदत करावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्यानंतर शंभुराज देसाई म्हणाले, सातार्यात राजे असल्यावर काहीच अडचण येणार नाही. त्यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, माझ्याकडे महत्त्वाचे बांधकाम खाते असले तरी आधीचीच देणी असल्यामुळे निधीची कमतरता आहे. त्यामुळे सध्या तुमच्या खात्याने हात ढिला सोडावा, आपण मार्चनंतर आपल्यातल्या आपल्यात डजस्टमेंट करू. निधीसंदर्भात दोन मंत्र्यांच्या मिश्किल विधानांवर उपस्थितांमध्ये हशा पिकला.