स्थैर्य, मुंबई, दि ६: कोरोना पार्श्वभूमीवर जवळपास सात-आठ महिन्यांपासून शाळा बंद आहे. मात्र मार्चपासून ऑनलाइन वर्गांना सुरुवात झालेली आहे. उन्हाळा तसेच गणेशोत्सवामध्येही ऑनलाइन वर्गांना सुटी देण्यात आली नव्हती. यामुळे आता दिवाळीमध्ये सुट्या मिळतील अशी पालक-विद्यार्थी तसेच शिक्षकांना अपेक्षा होती. मात्र राज्य सरकारने केवळ पाच दिवसांची सुटी जाहीर केली आहे.
राज्य सरकारने केवळ 12 ते 16 नोव्हेंबर या पाचच दिवसत ऑनलाइन वर्गांना सुटी दिली आहे. या पाच दिवसांमध्ये ऑनलाइन वर्ष बंद असणार आहेत. असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कोरोनामुळे व्यवसाय, शिक्षणासह अनेक गोष्टी विस्कळीत झाल्या. सण उत्सवांवरही कोरोनाचा परिणआम झाला. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव हे सर्व साधेपणाने साजरे करावे लागले. उन्हाळी सुट्टीपासून सुरू असलेल्या ऑनलाइन वर्गांना एक-दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी जाहीर केली जाईल अशी पालक, विद्यार्थी व शिक्षकांना अपेक्षा होती. मात्र राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने 12 ते 16 नोव्हेंबरदरम्यान दिवाळी उत्सव असल्याने शाळांना फक्त पाच दिवसच सुट्टी जाहीर केली आहे. या काळात शाळांचे ऑनलाइन वर्ग बंद राहतील.