स्थैर्य, फलटण दि.२ : स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर सतत कार्यमग्न राहून संधीच्या शोधात असले पाहिजे. स्वत:चे. अस्तित्त्व निर्माण करायचे असेल तर स्वत:ला सिध्द करून संधी खेचून आणली पाहिजे. यासाठी मार्गदर्शकापेक्षा समुपदेशकाची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केले.
‘शाळा तेथे कौन्सेलर’ या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय धुळदेव ता.फलटण येथे करिअर कॉर्नर व कर्मवीर भाऊराव पाटील करिअर क्लब स्थापना उद्घाटन प्रसंगी स्कूल कमिटी व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुभाषराव शिंदे बोलत होते. यावेळी थोर देणगीदार विनयशेठ गांधी, हरिभाऊ माने, प्रभारी मुख्याध्यापिका सौ.माधुरी जाधव उपस्थित होते.
सुभाषराव शिंदे पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्था सतत विविध उपक्रम राबवित असते विद्यार्थ्यांचे समुपदेशन हा महत्त्वाचा भाग असून या विद्यालयात प्रभावीपणे समुपदेशनाचे काम केले जात आहे. निकालाची परंपरा चांगली आहे.त्यामुळे धुळदेव पंचक्रोशीतील पालकांचा रयतवर विश्वास आहे. येथे शिकणारा प्रत्येक विद्यार्थी जीवनाचे बहुमोल शिक्षण घेऊन बाहेर पडतो याचा विश्वास आहे.
यावेळी समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्तविकामध्ये शाळा तेथे कौन्सेलर व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत करिअर कॉर्नर, करिअर डे, करिअर क्लब, करिअर शिबिर, दहावी नंतर पूढे काय, केस स्टडी व विद्यार्थी वर्तन तसेच व्यवसायातील विविध संधी याबदल सविस्तर माहिती देऊन समुपदेशकाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील करिअर क्लबचे अध्यक्ष सुयश आवळे, उपाध्यक्ष तेजस्विनी बोडरे, सचिव समर्थ पोतदार, खजिनदार ओंकार केसकर, सदस्य सुरज खरात व संध्या मदने यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयश आवळे यांनी केले. आभार समर्थ पोतदार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकिता कोरपडे, प्रियंका कोल्हे, प्रतिक्षा नाळे, मानसी नाळे, समीर शेंडे, गौरव धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक प्रतिनिधी दिपक साळुंखे, विठ्ठल निकाळजे, वर्धमान गायकवाड व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.