दैनिक स्थैर्य | दि. ९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील काही गावांनी नीरा उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाला विरोध केला आहे. मात्र, नीरा उजवा कालव्याचे मंजूर असलेले अस्तरीकरणाचे काम पूर्ण झालेच पाहिजे. तसेच या कालव्याच्या अस्तरीकरणाचे संपूर्ण काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करून पाण्याची बचत करावी व हे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात शेवटच्या शेतकर्याला मिळाले पाहिजे, यासाठी फलटण पूर्वभागातील शेतकर्यांनी यााबाबतचे लेखी निवेदन संबंधित विभाग तसेच तहसीलदार, प्रांताधिकारी व विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले आहे.
या निवेदनाबरोबर पूर्वभागातील २० पाणी वापर सहकारी संस्थांचे ठराव जोडण्यात आले आहेत. दरम्यान, हे निवेदन स्वीकारल्यानंतर शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून अस्तरीकरण होण्याविषयी भूमिका घेऊ, असे आश्वासन प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी दिलेले आहे. तसेच विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनादेखील हे निवेदन देण्यात आले आहे. श्रीमंत रामराजेंनीही चर्चा करून अस्तरीकरणाविषयी सहकार्याची भूमिका असल्याचे सांगितले आहे.
निवेदन देताना फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष बजरंग नाना गावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक तथा बागायतदार तानाजी गावडे, विश्वासदादा गावडे, विकासकाका वरे, दिलीपकाका गावडे, युवराज मिंड, शिवाजी शेडगे, अनिरुध्द गावडे, डॉ. प्रीतम गावडे, नारायण पवार सर, तुकाराम शेंडगे, दादासाहेब खटके, डॉ. हनुमंत गावडे, अनिल फडतरे, संजय गावडे, मनोज गावडे तसेच पूर्वभागातील बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते तानाजी गावडे म्हणाले की, शासन स्तरावर सुरू असलेले कालवा अस्तरीकरणाच्या कामाविषयी निवेदन दिल्यानंतर भविष्यात इरिगेशन डिपार्टमेंटकडून माहितीच्या अधिकारात वेगवेगळी माहिती मिळाल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन आपणाला पुढे न्यायालयात जायचे आहे. तरी सर्व शेतकर्यांना विनंती आहे की, याविषयी आपण आपले मत सर्व शेतकर्यांपुढे मांडावे. मात्र, हक्काच्या पाण्यासाठी हा लढा आपल्याला एकजुटीने लढायचा असून हा लढा जिंकल्याशिवाय आता माघार घ्यायची नाही, असे तानाजी गावडे यांनी सांगितले.