कान्हेरी लेण्यांच्या सौंदर्यावर जी- २० देशांचे प्रतिनिधी भारावले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२२ । मुंबई । जी २० परिषदेच्या शेवटच्या दिवशी जी-२० प्रतिनिधींनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बोरीवलीनजीकच्या साष्टी बेटाच्या अरण्यात स्थित असलेल्या प्रसिद्ध कान्हेरी लेण्यांना भेट देवून या स्थळांची माहिती व इतिहास जाणून घेतला. कान्हेरी लेण्यांचे अप्रतिम सौंदर्य, नीरव शांतता आणि निसर्गरम्य परिसर पाहून सर्वजण भारावले. केंद्रीय पुरातत्व विभागाने या भेटीचे आयोजन केले होते.

या लेण्यांचा इतिहास, ‘कान्हेरी’ या शब्दाचा उगम कशा प्रकारे झाला याबाबतची माहिती प्रतिनिधींनी घेतली.  या लेण्यांतून भारताच्या बुद्धकाळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते. हा परिसर अत्यंत शांत आणि सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे त्यामुळे या भागात अनेक पर्यटक भेट देत असतात अशी माहिती केंद्रीय पुरातत्व विभागाने यावेळी जी-२० च्या प्रतिनिधींना दिली.

येथील बौद्ध भिक्खूंसाठी विहार, सभागृह, खोल्या. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्ती, डोंगर माथ्यावर पाण्याची टाकी आदींची माहिती त्यांना देण्यात आली. गुफा, तेथील स्तूपासंदर्भातील अनेक ऐतिहासिक घटना, तेथे राबविले जाणारे उपक्रम तसेच कान्हेरी गुफाच्या निर्मितीपासूनचा इतिहास याची माहिती परिषदेतील प्रतिनिधींना देण्यात आली. ब्राह्मी, देवनागरी आणि पहलवी या लिपीतील शिलालेख आणि वचननामे (एपिग्राफ्स), परिसरातील लहानमोठे धबधबे आदींबाबतही प्रतिनिधींनी जाणून घेतले.

जगभरातील प्रतिनिधींनी भारतीय शास्त्रीय संगीताचा घेतला आस्वाद

तुळशी तलाव येथे वन विभागाची निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी केंद्रीय पर्यटन विभागातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत केला होता. बासरी वादक देबो प्रिया, सुश्मिता चॅटर्जी, कलिनाथ मिश्रा आणि मृणाल मिश्रा यांनी भारतीय संस्कृतीतील विविध सुप्रसिद्ध गाण्यांवरती बासरी वादन केले. ज्याचा आस्वाद जी २० च्या प्रतिनिधींनी घेतला.


Back to top button
Don`t copy text!