
स्थैर्य, कातरखटाव, दि. 16 : भाग्यनगर (बोंबाळे ता खटाव) येथे सोमवारी रात्री २९ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असतानाच चोवीस तासातच त्या युवकांच्या आईला ही कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्याअनुषंगाने कातरखटाव परिसरा बरोबरच भाग्यनागर (बोंबाळे ) येथे कडक लॉक डाउन पाळण्यात आले होते. बाहेर गाव वरून येणाऱ्या व्यक्तींना गावोगावच्या शाळांमध्ये चौदा दिवस सक्तीने कोरोन्टाईन करणेत येत आहे तर स्वमालकीच्या घरात ज्यांची सोय आहे अशा व्यक्तींना स्व मालकीच्या घरात कोरंटाईन करण्यात येत आहे.
बोंबाळे येथील माता -पुत्र हे स्थानिक रहिवासी असून स्व मालकीच्या घरातच कुटुंबियासमवेत राहत आहेत. हा तरुण परिसरातील छोटीमोठी शेतीची कामे करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गत आठ दिवसापासून त्या युवकाला खोकला व पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कातरखटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व वडूज च्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तरीही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने वडूज च्या एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.मात्र प्रकृती सुधारत नसल्याने त्याला सातारा येथे हालविण्यात आले व तेथे घशाचे नमुने घेण्यात आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या युवकांची आई त्याच्या संपर्कात आल्याने आई च्या ही घशातील स्त्रावाचे नमुने काल घेण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बनपूरी,डाभेवाडी, पळसगाव येथील वातावरण निवळतेय तोपर्यंतच बोंबाळे येथे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, तहसीलदार डॉ अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक अशोक पाटील, डॉ. संतोष मोरे, डॉ. वैशाली चव्हाण आदीसह कोरोना कमेटीतील अधिकाऱ्यांनी गावास भेट देत गावच्या सीमा सील करत संपर्कातील सोळा जणांना मायणी येथे विलगिकरण कक्षात दाखल केले आहे.
नेमके कनेक्शन कोणते?बोंबाळे येथील “तो ” युवक व त्याची आई यांनी कोणताही प्रवास केला नाही की बाहेरून आले नाहीत मग त्यांना कोरोनाची लागण कोठून व कशी झाली ? याबाबत उलट सुलट चर्चा होत असून गत महिन्यात मुंबई वरून गावी आलेले नातेवाईक की पळसगाव कनेक्शन याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.