बाजार समितीच्या सुपर मार्केटमधील गाळ्यांची भाडेवाढ नियमानुसार

उपसभापती भगवान दादासाहेब होळकर यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 13 मार्च 2025। फलटण । कृषी उत्पन्न बाजार समितीने वेळोवेळी सुपर मार्केट गाळा भाडेवाढ दर 10 ते 12 वर्षांनी दुप्पट भाडेवाढ केलेली आहे. सद्याची भाडेवाढ ही समितीने 15 वर्षानंतर चर्चेतुन, सामंजस्याने आणि गाळेधारक यांच्याबरोबर बैठकीत समन्वयाने नियमानुसार केेली आहे. या महिन्यात संचालक मंडळाची मासिक बैठकीमध्ये थकीत गाळेधारकांच्या बाबतीत सविस्तर चर्चा करुन पुढील कार्यवाही करण्याचा गाळे भाडेबाबतचा योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे बाजार समितीचे उपसभापती भगवान दादासाहेब होळकर यांनी सांगीतले.

कृषि उत्पन्न बाजार समितीने गरजू व्यवसायधारकांना जीवनावश्यक व शेतीपुरक व्यवसाय करणेसाठी सुपर मार्केट गाळे भाडेतत्वावर दिलेले आहेत. मार्केटयार्ड फलटण येथे एकुण 248 सुपर मार्केट गाळे आहेत. त्यापैकी एकुण 148 गाळेंचे करारनामे संपलेले आहेत अथवा करार नाहीत. या गाळ्यांना बाजार समितीने खालीलप्रमाणे वेळोवेळी भाडेवाढ केलेली आहे.

बाजार समितीने 1997 या वर्षात 20 बाय 12 फूट गाळ्यासाठी मासिक भाडे रुपये 300 तर 20 बाय 10 फूट गाळ्यासाठी मासिक भाडे रुपये 200 तर 2009 या वर्षात 20 बाय 12 फूट मासिक भाडे रुपये 600 तर 20 बाय 10 फूट गाळ्यासाठी 400 रुपये अशी मासिक भाडेवाढ केली आहे. 2023 या वर्षांत 20 बाय 12 फूट गाळ्यासाठी मासिक भाडे रुपये 1250 तर 20 बाय 10 फूट गाळ्यासाठी 650 रूपये अशी मासिक भाडेवाढ केली आहे.

2013-14 ते 2015-16 या कालावधीतील लेखापरिक्षण अहवाल, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडील आदेशानुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2017 पासून बांधकाम विभागाने ठरविलेल्यानुसार भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. तथापि त्यावेळी गाळेधारकांनी केलेले उपोषण, आंदोलन तसेच याबाबत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, फलटण यांनी केलेली मध्यस्थी विचारात घेऊन पणन संचालक पुणे यांच्याकडील भाडेवाढीबाबतच्या म्हणण्यानुसार भाडेवसूली सक्तीने वसुली न करण्याचा निर्णय घेतला होता.

सध्या सुधारित भाडेवाढ व वाढीव डिपॉझिटच्या अंमलबजावणीचे बाबतीत ज्या गाळधारकांचे करार संपुष्टात आलेले आहेत अथवा अद्याप ज्यांचे करारच नोंदविण्यात आलेले नाहीत त्यांना बांधकाम विभागाने ठरविलेल्या दराने सुधारित भाडेवाढ व वाढीव डिपॉझिट लागु करावे. परंतु ज्या गाळेधारकांचे करार अद्याप संपुष्टात आलेले नाहीत त्यांचे बाबतीत करारातील तरतुदीनुसार भाडेवाढ बाबत कार्यवाही करण्यात यावी तसेच पोटभाडेकरु बाबत बाजार समितीने कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी असे पणन संचालनालय पुणे यांनी कळविले आहे. यापुढे गाळ्याकरिता बांधकाम विभागाने ठरविलेल्या दरानुसार पुढील गाळ्यास मासिक भाडे रक्कम रु.2833/- व मागील गाळ्यास मासिक भाडे रक्कम रु.1533/- (संकलित कर व जीएसटी वगळून) लागु करावे असे निर्देश पणन संचालनालयाने दिले होते.असे असले तरीदेखील बाजार समितीची निवडणुक झाल्यानंतर सुपर मार्केट गाळा भाडेवाढीबाबत बाजार समितीने संचालक मंडळ, गाळेधारक यांचेसोबत तीन वेळा बैठका घेण्यात आल्या.

या बैठकीत मार्केट रेट, गाळेधारकांचे व्यवसाय आणि भाडे कमी करावे ही गाळेधारकांची मागणी विचारात घेऊन सामंजस्याने भाडेवाढीबाबतचा निर्णय घेण्यात आला. ही भाडेवाढ दिनांक 01 ऑगस्ट 2023 पासून प्रत्यक्षात लागु करण्यात आली. त्यास अनुसरुन पुढील गाळ्यास 1250/- व मागील गाळ्यास रु.650/- (जीएसटी व संकलित कर वगळून) इतके भाडे अंतिम करण्यात आले. त्यानुसार भाडेवाढीनंतर खालीलप्रमाणे साधारणतः सुपर मार्केट गाळा भाडे वसुली झालेली आहे.

2023-24 या वर्षात भाडेवाढीनंतर अपेक्षित भाडे 22,00,000/- रुपये होते. तर प्रत्यक्षात बाजार समितीस 15,00,000/- एवढी रक्कम मिळाली. 2024-25 या आर्थिक वर्षात 28,00,000/- अपेक्षित भाडे रक्कम होते. तर प्रत्यक्षात 9,00,000/- रक्कम मिळाली. बाजार समितीस भाडेवाढ लागु झाल्यानंतर साधारणतः एकुण रु. 24,00,000/- इतके भाडे प्राप्त झाले आहे. तसेच भाडेवाढ लागु होणेपुर्वीचे एकुण भाडे रु.2,25,000/- इतके थकीत भाडे आहे.

या पत्रकार परिषदेस प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी, समितीचे संचालक टी. डी. शिंदे, समर जाधव, शरद लोखंडे, अक्षय गायकवाड, संतोष जगताप, निलेश कापसे, समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!