स्थैर्य, सातारा, दि. १: कधी पर्यंत दलालाच्या हातात आमच्या आर्थिक नाड्या द्यायच्या, आमची पोरं शिकलीत आता त्यांनाही कळतंय आमचं नेमकं कुठं जळतंय, आणि आम्ही कुठं विजवत बसलोय… आता आम्हाला पेटलेलं विझवायचं नाही तर पेटूच नये याचा इलाज करायचा आहे. आता आम्ही बाजाराची गरज ओळखून उत्पादन करु म्हणजे आता आम्ही जे बाजारात विकलं तेच पिकवू… यापुढे जाऊन आम्ही आता कच्चा मालावर प्रक्रिया करून बाजाराला आवश्यक असलेला पक्का माल आकर्षक रूपात बाजारात देऊ… आज पर्यंत आम्ही बाजाराचा अभ्यास न करता अनेकदा एका पिकाला भाव येतोय म्हणून मुबलक तेच पीकवलं… आवक वाढली बाजार पडला आणि आम्ही बुडालो… हे नित्याचेच होते आता तसे होणार नाही… आता आम्ही पिकवू आम्हीच ठरवू काय विकायचे आणि कितीला विकायचे… होय आता शासनही आमच्या पाठीशी आहे… हे सांगतायत वसुंधरा शाश्वत शेती समृद्धी शेतकरी समूह, रहीमतपूर ता. कोरेगाव जि. सातारा येथील शेतकरी..!!
रहीमतपूर शहरापासून अर्धा किलो मिटर वरून एक…फाटा जातो… त्याच रस्त्यावर ऊर्जा कंपनीचा बोर्ड लागतो, बाहेरून बघितलं तर ऊसाचे ढीग आणि चरख्यात घालून रस काढणारी लोकं… प्रथम दर्शनी गुऱ्हाळ असेल असं फील देणारं दृश्य… पण आत गेल्यास हे गुऱ्हाळ नव्हे योग्य नियोजन करून निर्माण केलेला कारखाना आहे.. सर्वांची भेट होते, भेटेत कळतं, कारखाना लॉक डाऊन काळात विक्रमी कमी वेळात उभा केला आहे. कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांच्या सल्यावरून हा कारखाना काढण्याची प्रक्रिया सुरु झाली.प्रा. नितीन बानगुडे पाटील या शेतकरी संघाचे संचालक आहेत. संचालक बॉडीमध्ये प्रकाश सुर्यवंशी, अनंत माने, प्रशांत भोसले व किरण भोसले.
संचालक श्री. बानुगडे-पाटील सांगतात, वसुंधरा शाश्वत कृषी समृध्दी शेतकरी संघाच्यावतीनं मी या संघाच्या मार्फत शासनाची जी समुह शेती योजना आहे, त्यामार्फत आम्ही रहिमतपुर येथे हा गुळ प्रक्रिया उद्योग उभा केला आहे. खरंतर कुठलाही प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक कच्चा मालाची उपलब्धता, भांडवली गुंतवणूक आणि त्यानंतरची महत्वाची आहे बाजारपेठ. शेतकरी पीक उत्पादन जरुर करतो. पण, भांडवालाच्या अभावी त्याला त्याच्यावर प्रकिया उद्योग उभारता येत नाही. किंबहुना त्याला तशी बाजारपेठ उपलब्ध असत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष फक्त शेती आणि शेती करणं एवढच शेतकऱ्यांचं उद्दीष्ट राहीलं आहे. पण या वसुंधरा शेतकरी संघाच्या माध्यमामार्फत आम्ही शेतकऱ्यांना अधिक मायक्रो लेवलवर न्यायचा प्रयत्न करतो आहोत.
जेवढ्या अधिक प्रक्रिया होतील तेवढं शेतकऱ्यांचं उत्पन्न हे अधिकाधिक वाढत जाणार आहे. रहिमतपुरसारख्या भागाचा जर विचार केला तर इथं ऊसाचं पिक प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं. इतकं की, बऱ्याच वेळेला साखर कारखान्याच्या क्षमताच संपतात. आणि ऊस शेतात पडुन राहतो. किंबहुना तो शेतकऱ्यांना जाळुनच घालवावा लागतो. त्यामुळं ही गोष्ट लक्षात घेऊन आम्हाला इथं कच्चा मालाची उपलब्धता प्रचंड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं या शेतकऱ्यांचं उत्पादन जर वाढवायचं असेल.
तर तसा प्रक्रिया उद्योग इथं असावा या हेतुनं आम्ही हा गुळ प्रक्रिया उद्योग उभा केला आहे. शासनाचे त्यासाठी आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळालं. खर तर सातारा जिल्ह्याचं कृषी खात्याच्या आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यामुळे हा उद्योग उभा राहू शकला.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी ज्या शासनाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या समृध्दीच्या ज्या योजना आणल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची समुह शेतीची योजना आहे. त्याच्यामधुन हा प्रक्रिया उद्योग इथं उभा राहीला, हे सगळ्यात महत्वाचं. आता शेतकऱ्यांच्या बाबतीत एखादा प्रक्रिया उद्योग जर उभा करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते भांडवली गुंतवणुक. शेतकऱ्याकडं ती नसते. पण शासनाच्या माध्यमानं आम्हाला साधारणपणे हे भांडवल उपलब्ध झालं. हा प्रक्रिया उद्योग साधारणपणे १ कोटी ९६ लाखाच्या आसपास याचा खर्च जातो. त्यापैकी १ कोटी अनुदान शासनामार्फत आमच्या या प्रक्रिया उद्योगाला मिळालं. यापैकी ६० लाख रुपये आम्हाला इथं उपलब्ध झालेत. उरलेले बाकीचे पुढच्या प्रक्रिया ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी आम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे एकंदरच आता आमचा समाज हा विषमुक्त अन्न खाण्याच्या प्रवाहात येतो आहे. तर अशावेळी त्या लोकसंख्येला विषमुक्त अन्न उपलब्ध करुन देणं ही शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्या द्ष्टीनं आम्ही सेंद्रीय शेतीला शेतकऱ्यांना प्रवृत्त करतो आहोत.
आमच्या इथ जो गुळ तयार होईल जी पावडर तयार होईल ती सुध्दा त्या पध्दतीची सेंद्रीय पध्दतीनं बनविलेली असेल. ती विषमुक्त असेल. त्यामुळं एकीकडं शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभं करतांना या अन्न दात्याकडनं पिकवलेलं अन्न हे सुध्दा विषमुक्त असलं पाहिजे यादृष्टीनचं आम्ही हा प्रयोग करतो आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आमचे जे या गटाचे सगळे सहकारी आहेत त्यांनी सुध्दा झपाटलेपणाने हे सगळं काम केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे या भागातल्या शेतकऱ्यांच्या विकासाला हा प्रक्रिया उद्योग अत्यंत प्रेरक ठरेल आणि मला खात्री आहे की, वसुंधरा शाश्वत शेती गटाचा हा गुळ निश्चितीच अमेरीकेसारख्या बाजारपेठेतही स्वत:च स्थान मिळवेल असा विश्वासही प्रा. बानगुडे- पाटील यांनी व्यक्त केला. वसुंधरा शाश्वत शेती समृद्धी शेतकरी समूहा कडून “ऊर्जा सेंद्रिय गुळ, गुळ पावडर आणि इतर उप पदार्थ” करणारा कारखाना सुरु केला आहे. नेमकं काय होतं इथे,हे पाहण्यासाठी गेलो… आणि शेतकरी उद्योजक बनत आहे हे चित्र पाहून हरकून गेलो…!!
– युवराज पाटील,जिल्हा माहिती अधिकारी, सातारा.