स्थैर्य, दि.८: कोल्हापूर जिल्ह्यातून भारत बंदला प्रतिसाद लाभला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत येथे शेतकऱ्यांनी स्वत:ला जमीनीत गाडून घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन जमीनीत गाडून घेतलेल्या शेतकऱ्यांनी बळीराजाला गाडणाऱ्या प्रवृत्तीचा धिक्कार केला.
कोल्हापूर ता.करवीर येथील बालाअवधुत नगर, फुलेवाडी रिंग रोडवर अमोल गणपतराव माने (माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज रोजी पुकारण्यात आलेला भारत बंद ला पाठिंबा म्हणून खड्ड्यांमध्ये स्वतःला जमिनीत कमरेपर्यंत गाडून घेऊन आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात कडकडीत बंद पाळून अनेक ठिकाणी केंद्र शासनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी.शिरोळ येथे कडकडीत बंद पाळुन अन्यायकारी कायद्याची होळी करत शेतकरी कायद्याचा विरोध केला. शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, हमी भावाला कायदेशीर अधिकार मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.