
स्थैर्य, 14 जानेवारी, सातारा : ‘जाऊ देवांचिया गावा… येऊनि मोर्व्यात चिलेराय ते पाहावे…’ अशा भक्तिभावाने प्रतिवर्षी श्री क्षेत्र जेऊर (ता. पन्हाळा) येथून दत्त मंदिर संस्थान (मोर्वे, ता. खंडाळा) असा निघणारा सद्गुरू चिले महाराजांचा पायी पालखी रथ सोहळा गुरुवारी (दि. 15) जेऊर येथून प्रस्थान ठेवणार आहे, तर सोमवारी (ता. 26) तो मोर्वे येथे पोचणार आहे.
सद्गुरू चिले महाराजांचे 26 जानेवारी 1984 मध्ये प्रथमतः मोर्वे येथील दत्त मंदिर संस्थानच्या भूमीत आगमन झाले. तेव्हापासून सद्गुरू हिंगमिरे देवांच्या कृपाशीवादनि प्रतिवर्षी हा पायी पालखी सोहळा आयोजित केला जातो. (दि. गुरुवारी 15) जेऊरच्या श्री चिले महाराज आणि भैरवनाथ मंदिरापासून या सोहळ्याचे प्रस्थान होईल. तेथून शुक्रवारी पैजारवाडी (ता. पन्हाळा) कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर मुक्काम, शनिवारी कोल्हापुरात ’श्रीं’च्या रथ सोहळ्याची भव्य मिरवणूक आणि मुक्काम, रविवारी टोपमार्गे वाठार येथे मुक्काम, सोमवारी पेठनाका, मंगळवारी(दि. 20) कराड येथे आगमन व रथोत्सव मिरवणूक, मुक्काम होईल.
बुधवारी गांधीनगर (काशीळ) येथे मुक्काम होऊन गुरुवारी (दि. 22) दुपारचा महाप्रसाद अजिंक्यतारा कारखाना येथे आणि सायंकाळी सातारा शहरात आगमन होऊन रथ मिरवणुकीसह पोलिस करमणूक केंद्रात मुक्काम होईल.शुक्रवारी (दि. 23) उडतरे येथे मुक्काम आणि दुसर्या दिवशी शनिवारी (दि. 24) पहाटे भुईंजच्या कृष्णा नदीपात्रात पादुकांचा स्नान सोहळा रंगणार आहे. रात्रीचा मुक्काम खंडाळा येथे होणार असून, रविवारी (दि. 25) अहिरे येथे भैरवनाथ मंदिरात मुक्कामआणि सोमवारी (दि. 26) हजारो भाविकांच्या उपस्थितीत पायी पालखी सोहळ्याचे मोर्वे येथे आगमन होणार आहे.
