दैनिक स्थैर्य । दि. १४ मार्च २०२३ । मुंबई । नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येणार आहे. यासाठी अभ्यासक्रम आराखडा अंतिम करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
यासंदर्भात सदस्य निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
मंत्री श्री. केसरकर म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पायाभूत स्तर, शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण अशा चार टप्प्यांचा आराखडा आहे. हे धोरण राज्यात राबविताना त्यात अनुरूप बदल करण्यात येऊन राज्याचा आराखडा तयार झाल्यानंतर त्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येत आहे. या समितीचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण राबविण्यात येईल. या अंतर्गत बोलीभाषा संवर्धनासाठी देखील प्रयत्न करण्यात येईल, असे मंत्री श्री. केसरकर म्हणाले. हे काम पारदर्शकपणे करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.