दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘श्रेयवादात पडायची गरज नाही. सर्वसामान्यांच्या डोळ्यादेखत फलटण तालुक्याचं चित्र बदललेलं आहे. मूळ दुष्काळाची समस्या श्रीमंत रामराजेंनी दूर केली आहे. फलटण – खंडाळा एमआयडीसीत उद्योग आणून स्थिरता आणली आहे. मार्केट कमिटी लोकांना माहित नव्हती. श्रीमंत रघुनाथराजेंनी ती हातात घेतल्यावर तिचा विस्तार झालाय. पेट्रोलपंप, रुग्णालय, 10 रुपयांत जेवणाची थाळी, स्पर्धा परीक्षा क्लासेस असे अनेक उपक्रम मार्केट कमिटीच्या माध्यमातून सुरु झाले आहेत. गेल्या 30 वर्षात तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राजे गटाची सत्ता आहे. प्रत्येक ठिकाणी निधी देण्याचं काम आपण केलं आहे. बंद पडलेल्या संस्था, उद्योग आपण सुरु केलेले आहेत’’, असे मत फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ शहरातील गजानन चौक येथे पार पडलेल्या जाहीर सभेत श्रीमंत विश्वजीतराजे बोलत होते.
श्रीमंत विश्वजीतराजे पुढे म्हणाले, ‘‘1999 पासून राजे गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत काम केलं आहे. ज्या त्रासामुळे आपण अजितदादांसोबत सत्तेत गेलो, तिथे भाजपचेच वर्चस्व असल्याने आपल्याला त्रास होतच होता. त्यामुळे आपण पुन्हा पवारसाहेबांकडे आलो आहोत. वैचारिक राजकारण जपण्यासाठी आपल्याला शरद पवारांचे हात बळकट करायचे आहेत’’.
‘‘साखरवाडीच्या सभेत अजितदादांनी सुरुवातीला उत्तम भाषण केलं. नंतर त्यांना वारंवार चिठ्ठ्या देवून उचकवण्यात आलं आणि मग दादांनी रामराजेंवर उपरोधिक टिका केली. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील तीव्र संताप व्यक्त झाला. त्याला कारण श्रीमंत रामराजेंनी आजवर केलेली विकासकामे आहेत. खरंतर आपण जेव्हा घरवापसी केली तेव्हा अजितदादांनीही घरवापसी करायला हवी होती. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर कदाचित ते मुख्यमंत्री झाले असते कारण अजितदादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न फक्त शरद पवारचं करु शकतात’’, असे सांगून ‘‘येत्या 20 तारखेला आपण दीपक चव्हाण यांना विजयी करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा’’, असेही आवाहन श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केले.