स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१७: ब्रिटनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जूनमध्ये होणाऱ्या G-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. G-7 मध्ये अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, जपान आणि इटली या देशांचा समावेश आहे. सर्व सदस्यीय देश आळीपाळीने G-7च्या वार्षिक परिषदेचे आयोजन करतात. यावर्षी 11 ते 13 जून दरम्यान ब्रिटनच्या कॉर्नवॉलमध्ये ही परिषद होणार आहे. त्याचबरोबर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की, शिखर परिषदेच्या आधी ते स्वत: भारत भेटीवर येतील.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाला देखील आमंत्रित केले
निवेदनात म्हटले की, भारतव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियालाही अतिथी देश म्हणून शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. या शिखर परिषदेत या 3 देशांच्या सहभागामुळे जगातील लोकशाही व तंत्रज्ञानाने प्रगत राष्ट्रांमधील सहकार्य आणखी वाढण्यास मदत होईल. या परिषदेत कोरोनाव्हायरस, हवामान बदल आणि व्यापाराशी संबंधित जागतिक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.
G-8 ते G-7
2014 पर्यंत G-7 ला G-7 म्हणून ओळखले जात असे. या परिषदेत रशियाचा देखील समावेश होता. मात्र रशियाने क्राइमियावर हल्ला करून तो प्रदेश ताब्यात घेतला. आताही तिथे रशियाचा अधिकार आहे. तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी याला कडाडून विरोध दर्शविला आणि रशियाला या संघटनेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविला. ट्रम्प यांची इच्छा होती की रशिया पुन्हा संघटनेत सामील व्हावा, परंतु उर्वरित देश हे मान्य करण्यास तयार नव्हते.