स्थैर्य, वाई, दि.०५: बावधन येथे घरात अकरा वर्षाचा मुलगा असल्याचे पाहून तिन-चार जणांनी घरात घूसन जबरी चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली. तथापि, तपासामध्ये संंबंधित मुलानेच हा सर्व बनाव रचल्याचे समोर आले. त्याच्याकडून घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने आई-वडिल मारतील या भीतीने त्याने हा बनाव केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बावधन, ता. वाई येथे सकाळी 10च्या सुमारास पिसाळ कुटुंबियांच्या घरात चोरी झाल्याची खबर पोलिसांना मिळाली. यानंतर वाई पोलीस ठाण्याचे पोनि आनंदराव खोबरे, पो.नि व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करुन पिसाळ व त्यांचा इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत असलेला मोठा मुलगा वय 11 वर्षे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली.
यावेळी मुलाने सांगितले की, आई-वडील सकाळी 08 वाजता कामाला गेले. यानंतर राकाळी 09.30 वाजण्याच्या सुमारास आजी रानात गेली. त्यानंतर मी घरात एकाटाच दरवाजा खिडक्या आतून बंद करुन बसलो होतो. यावेळी एका माणसाने बाहेरुन दरवाजा वाजवला म्हणून मी खिडकीतून काय पाहीजे असे विचारले असता काकाला डबा दे, असा तो माणूस म्हणाल्याने मी दरवाजा उघडला असता मला धक्का देवून घरामध्ये तीन मोठी माणसे व एक 15-16 वर्षाचा मुलगा आला. त्यांच्या पैकी एकाने माझे तोंड दाबून मला बुक्क्या मारल्या व लॉकरची चावी मागितली. मी त्यांना चावी नाही असे म्हणालो. तेव्हा इतर त्याचे साथीदार घरातील कपाट, पेट्या व डबे उचकटत होते. मला पकडलेल्या माणसाने माझे तोंड दाबून माझ्या पायात भुलीचे इंजेक्शन देण्याचा प्रयन्त केला. तेव्हा मी त्यास लाथ मारल्याने भुलीचे इंजेक्शन त्याचेच दंडात घुसले व तो खाली पडला. त्यावेळी मी दरवाजाची कडी काढून पळून गेलो. मी पळून गेल्याने ते लोक त्यांच्या पडलेल्या साथीदाराला उचलून घेवून मागच्या दाराने पळून गेले व रोडवर उभा असलेल्या बलोरोसारख्या गाडीत बसून निघून गेले. मी ओरडत शेजार्यांच्या घरी गेलो व त्यांना घडलेला प्रकार सांगून वडीलांना फोन करुन बोलविण्यास सांगितले. थोडयाच वेळात वडील घरी आले अशी हकिगत सांगितली.
संबंधित मुलगा सांगत असलेला प्रकार व घटनास्थळावरील परिस्थिती पाहता तो चुकीची माहिती सांगत असल्याचे वाटले. यामुळे पोलिसांनी गोड बोलून विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने खरी माहिती सांगितल्यानंतर हा बनाव असल्याचे समोर आले. सकाळी आई बाबा कामावर गेल्यानंतर आजीने तीचा मोबाईल सापडत नव्हता म्हणून मीच मोबाईल घेतला आहे असे समजून मला मारले. त्यानंतर आजी रानात गेली व मी तीचा मोबाईल शोधत असताना माझ्याकडून घरातील कपाटातल्या साड्या खाली पडल्या. पेटी तसेच धान्याचे डबे खाली पडले. तेव्हा डब्यात आजीचा मोबाईल डब्यात सापडला. परंतु, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते व आई बाबा परत घरी आल्यानंतर अस्ताव्यस्त पडलेले साहीत्य पाहून मला मारतील म्हणून मी भितीपोटी घरात चोरी झाली आहे, असे बाबांना फोन करून खोटे सांगितले होते असे सांगितले. मुलाने खरी हकिगत सांगितल्यानंतर वडिलांनी माझ्या मुलामुळे पोलिसांना त्रास झाला असल्याचे सांगत माफी मागितली.
वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आनंदराव खोबरे, उपनिरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलीस नाईक प्रशांत शिंदे, पो.कॉ.सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.