स्थैर्य, फलटण, दि. ४ : मुंबईवरचा निसर्ग वादळाचा धोका कमी झाला आहे. चक्रीवादळाची धोक्याची तीव्रता कमी झाली आहे. आता केवळ चक्रीवादळ येऊन गेल्यानंतरचे पोस्ट लॅन्डफॉल परिणाम दिसत आहेत. यामुळे मुंबईत पुढचे काही दिवस वारे आणि पाऊस अनुभवायला मिळेल. काल रात्रभरात हे परिणाम संपूर्णत: संपतील अशी माहिती आहे. असं असलं तरी या वादळामुळं मुंबई-पुण्यासह सातारा जिल्ह्यामध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह पावसानेही हजेरी लावली होती. फलटण शहरासह तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानेही हजेरी लावली होती. चक्रीवादळामुळं परिस्थितीमुळे शहराच्या विविध भागात काल रात्री झाड पडण्याच्या घटना तर पाणी साठल्याच्या घटना घडल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन त्याचा अहवाल त्वरीत प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या. यामध्ये मनुष्य हानी, जनावरे, घरांचे नुकसान (कच्ची,पक्की, झोपड्या) तसेच शेती पिकाचे नुकसानीचे पंचनामेही करावेत. संबंधित यंत्रणांनी स्वत: जातीने लक्ष घालून कोणीही नुकसानग्रस्त वंचीत राहणार नाही याची काळजी घेण्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये काल (बुधवार) पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादाळाचा तडाखा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, जावळी, पाटण तालुक्यांना बसू शकताे. त्यामुळे नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन केले होते. सातारा शहरात सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. सकाळी साडे सहाच्या सुमारास सुरु झालेला पाऊस साडे दहापर्यंत संततधार सुरुच हाेता. त्यामुळे सातारा शहरातील नऊ वाजता उघडणारी बाजारपेठ दहा वाजेपर्यंत उघडलीच नव्हती. पावसाचा जाेर काही केल्या कमी हाेईना त्यामुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे. तसेच या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सातारा येथे सर्व प्रमुख रस्ते पावसाने सुने सुने झाले होते. रस्त्यावर दररोज दिसणारी गर्दी अजिबात नव्हती.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील पावसाची रिमझिम सुरुच आहे. साेसाट्याच्या वारा सुटल्याने काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर पडून वाहतूकवर्दळ थांबली आहे. माण तालुक्यात कुकुडवाड परिसरात दाट पहाटेपासूनच धुक्यासह रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिक घरातच बसून आहेत. याबराेबर दुधेबावी परिसरात वारा व रिमझिम पाऊस सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार हवामान खात्याचा अंदाजा नुसार उद्या गुरुवारी ही अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 120 किलाे मीटर या वेगाने असू शकतो. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील विशेषत महाबळेश्वर, जावली, वाई पाटण या तालुक्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, कच्चे घर असल्यास तात्काळ सूरक्षित ठिकाणी आवश्यक साहित्य व पशूधनासह स्थलांतरित व्हावे, विजेचे खांब तारा व झाडे यापासून दूर रहावे असे आवाहनही जिल्हा नियंत्रण कक्षाने केले आहे.