वीज वितरणाच्या कारभाराने सर्वसामान्यांचा संतापाचा मीटर घेतोय वेग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 2 : संपूर्ण देशात गेली तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असून सर्वांनाच आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. अशावेळी सामान्यांना दिलासा देण्याऐवजी वीज मंडळाच्या वतीने वीजबील भरणा करण्याची सूचना केली जात आहे. याबाबत मनसेने घरगुती वीजबिल माफ करावे यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. दरम्यान, पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबतही मनसे सैनिकांनी दरवाढ कमी करण्याची जोरदार मागणी केली. या आंदोलनामुळे वीजमंडळाला चांगलाच झटका बसण्याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र  नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.विकास पवार, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील व विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष युवराज पवार, महिला जिल्हाध्यक्षा आश्विनी गोळे, मिनाक्षी शिंदे-पोळ यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक अंतर ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसे सैनिकांनी सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेवून आंदोलन केले होते. या वर्षात मनसेच्या सातार्‍यातील आंदोलनाने सातारकरांना विरोधी पक्षाच्या आस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेवून लढणार्‍या मनसे सैनिकांनी अनेक विधायक उपक्रम राबविले. विशेषत: धैर्यशील पाटील, युवराज पवार, अ‍ॅड. विकास पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी गोरगरीब बांधवांना मोफत अन्नधान्याचे वाटप करून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. आजही स्वखर्चाने मनसे सैनिक मदत करीत आहेत. मनसे म्हणजे नुसते खळखट्टयाक नसून मानवतेतून मदत करणारेही सैनिक आहेत यांची जाणीव आता जनतेला झालेली आहे.

आज झालेल्या आंदोलनाने घरगुती वीजबिल माफ व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचे दर कमी व्हावेत त्याचबरोबर आरटीओ कर, वाहनाची विमा पॉलिसी अशा विविध करांमध्येही सूट मिळावी, शेतकर्‍यांना बोगस बि-बियाणे देणार्‍यांवर कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी, एफआरपी प्रमाणे शेतकर्‍यांच्या ऊसाचे बिल साखर कारखान्यांनी द्यावे अशीही मागणी करण्यात आलेली आहे. लोकशाही मार्गाने या मागण्या मांडल्या असून सर्वसामान्यांना केंद्रबिंदू माननारे सरकार सत्तेत आहे, याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवून या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मनसे स्टाईलने मागण्या मान्य करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले.

यावेळी राजेंद्र बावडेकर, शिवाजी कासुर्डे, अविनाश दुर्गावडे, राहुल पवार, राजू केंजळे, सागर बर्गे, विनय गुजर, भरत रावळ, अजहर शेख, विशाल माने, सूरज लोहार, गोरख नारकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!