स्थैर्य,मुर्शिदाबाद, दि.१८: प. बंगाल विधानसभेच्या निवडणुका जवळ येउ लागल्या असताना भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अगोदर आरोप प्रत्यारोप होत होते. त्याची जागा आता हल्ल्यांनी घेतली आहे.
मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या निमटीटा रेल्वेस्थानकावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेले जाकीर हुसेन जखमी झाले आहेत. दरम्यान, आजच झालेल्या अन्य घटनेत उत्तर कोलकाता जवळ काही अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सिंह राय जखमी झाले आहेत.
फूल बागान परिसरात झालेल्या हल्ल्यात राय जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला झाला तेव्हा सुवेदु अधिकारी आणि शंकुदेव पांडा हे अन्य नेतेही राय यांच्या समवेत होते. काही दिवसांपूर्वीच अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, बॉम्बहल्ल्याच्या घटनेत मंत्री जाकीर हुसेन यांच्यासह अन्य दोघेही जखमी झाले असून त्यांनाही उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार राज्यमंत्री असलेले हुसेन का रात्री दहाच्या सुमारास कोलकाता येथे जाणाऱ्या रेल्वेगाडीची वाट पाहत प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबले होते. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
दरम्यान, तृणमूलचे राजकीय विरोधक या हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप या पक्षाचे आमदार मलय घटक यांनी केला आहे. तर पक्षातील अंतर्गत भांडणांमुळे हुसेन यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुशर्रफ हुसेन यांनी केला आहे.