शिवाजीनगरमधून बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा पोलिसांकडून सहा तासात उघडकीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२३ | फलटण |
प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी प्रियकराने त्याच्या साथीदारासह बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा गळा आवळून त्याचे हातपाय दोरीने बांधून त्यास नीरा कॅनॉलमध्ये टाकून खून केला असल्याचे उघडकीस आले आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे दाखल बेवारस अनोळखी मयताच्या खुनाचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून सहा तासामध्ये उघडकीस आणण्यात आला आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी, दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास श्री सिद्धनाथ गणेश तरुण मंडळ, शिवाजीनगर, फलटण येथून अजित पोपट बुरुंगले (वय २४, रा. नगर परिषद शाळा क्र. ७ च्या पाठीमागे शिवाजीनगर, फलटण) हा घरात कोणास काही एक न सांगता बेपत्ता झाला होता. त्याच्या मिसिंगची तक्रार पोपट बुरुंगले यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली होती.

ही मिसिंगची केस दाखल झाल्यानंतर पो.नि. सुनील शेळके, यांनी मिसिंग तपास म.पो.ना. बोबडे यांच्याकडे दिला होता. तपास करत असताना १९ सप्टेंबर रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीत दाखल मिसिंगच्या वर्णनाची एक अनोळखी बेवारस प्रेत मिळून आले. त्याप्रमाणे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फलटण शहर पोलीस ठाण्यातील मिसिंगचे वर्णन व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील मिळून आलेले अनोळखी बेवारस मयताचे वर्णन व कपडे यांचे साधर्म्य असल्याने सदर मिसिंग तपासकामी पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची खास नियुक्ती करून मिसिंग व्यक्तीच्या सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण तसेच मिसिंग व्यक्तीच्या पत्नीकडे कौशल्यपूर्ण तपास करून या तपासात मयत अजित पोपट बुरुंगले याची पत्नी हिचे आरोपी कर विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, संस्कृती हॉटेलच्या मागे, केसनंद, पुणे) याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधास व लग्न करण्यासाठी तिचा पती हा अडथळा येत असल्याने आरोपीने त्याचे साथीदार राहुल उत्तम इंगोले (वय २२, रा. लोहमार्ग रोड, बालाजी ट्रेडर्सच्या समोर, वाघोली, पुणे) याच्या मदतीने मिसिंग अजित बुरुंगले याचा दोरीने गळा आवळून त्यानंतर त्याचे हात-पाय बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यास नीरा उजवा कॅनॉलमध्ये टाकून देऊन त्याचा खून केला आहे, अशी कबुली आरोपी करण विठ्ठल भोसले याने दिली असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील दाखल गुन्हा फलटण शहर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला असून या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये आरोपी करण विठ्ठल भोसले (रा. थेऊर रोड, केसनंद, पुणे) व शिवाजी अजित पोपट बुरुंगले (वय १९, रा. शिवाजीनगर, फलटण) यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पो.नि. सुनील शेळके करत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस, पो.नि. सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक सूरज शिंदे, पो.ह. वाडकर, थापते, पो.ना. जगताप, पाटोळे, कर्णे, खराडे, मपोना बोबडे, वाघ, फाळके, मपोकॉ करपे यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!