चौकशीसाठी घेऊन गेले होते पोलिस, त्यानंतर घरी परतलाच नाही व्यापारी; शेजारी म्हणाले- तो स्विमर होता, बुडालाच कसा?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,मुंबई , दि. ६: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली व धमकीपत्र असलेली कार आढळल्याने खळबळ उडाली असतानाच शुक्रवारी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. मनसुख बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. दरम्यान, हिरेन यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला, तर दुसरीकडे आपली मानसिक स्थिती ठीक नाही, असे पत्र हिरेन यांनी मुंबई व ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याचेही समोर येत आहे. मनसुख यांनी आत्महत्या करणे शक्यच नाही, असा दावा पत्नी व मुलाने केला.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी याचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवंेद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे तथ्यांच्या आधारे हा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी केली. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्याची घोषणा केली.

ते चांगले स्विमर, आत्महत्या करणार नाहीत : वडिलांनी आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा दावा खोटा असल्याचे सांगत “ते चांगले स्विमर होते, कधीच आत्महत्या करणार नाहीत,’ असा दावा त्यांच्या मुलाने केला. त्यांच्या शेजाऱ्यांनी देखील हाच प्रश्न उपस्थित केला.

अर्णबला अटक केली म्हणून राग आहे का?
– सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीला अटक केली होती. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात सात दिवस अर्णब अटकेत होते. याचा राग विरोधी पक्षाच्या मनात आहे का, अशा शब्दांत गृहमंत्री देशमुख यांनी फडणवीसांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिले.
– अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करत असूनही सहा महिने उलटून गेले तरी काहीच हाती आले नसल्याचे देशमुख म्हणाले.
– हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सापडला तेव्हा त्यांच्या अंगावर कोणतेही व्रण नव्हते, असेही ते म्हणाले.

यावर काहीच का बोलत नाहीत?
– पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे जून व जुलै २०२० मध्ये याच गाडीमालकाशी संभाषण झाल्याचा सीडीआर आहे. हे दोघे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते का?
– गाडीमालक ठाण्याचा, तपास अधिकारीही ठाण्याचा. शिवाय ही गाडी चोरी झाल्यानंतर ठाण्याहूनच कशी घटनास्थळी येते?
– “त्या’ स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन हेच या प्रकरणातील सर्वात मोठा दुवा होता. त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याच्या सूचना होत्या. मात्र, आता त्यांचाच मृतदेह सापडला हे खळबळजनक आहे.

तपास एटीएसकडे : अनिल देशमुख
सायंकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर बोलताना सांगितले, हिरेन यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांचे हातपाय बांधलेले नव्हते. “ती’ गाडीही त्यांची नव्हती. ती गाडी श्याम पीटर न्यूटन यांची होती. इंटेरियरच्या कामाचे पैसे न दिल्यामुळे हिरेन यांनी ती गाडी ताब्यात ठेवली होती. एटीएस याचा तपास करेल.

तपास एनआयएकडे द्या : फडणवीस
अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली असताना त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित करून तपास एनआयएकडे सोपवावा, अशी मागणी विधानसभेत केली.

या प्रश्नांवर अजूनही रहस्य कायम?
– स्फोटके असलेल्या कारमधून मागच्या दाराने बाहेर पडलेली व्यक्ती कोण, हे अजूनही समाेर आले नाही.
– घटनास्थळी दोन कार आल्या होत्या. ठाण्याहून एकाच मार्गाने आलेल्या या गाड्यांपैकी दुसरी गाडी कुणाची?
– एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे अंबानींच्या घराजवळ घटनास्थळी सर्वात अगोदर कसे दाखल झाले.
– १७ फेब्रुवारीला मनसुख क्रॉफर्ड मार्केटमध्ये आले. येथे पोलिस मुख्यालय आहे. ते कुणाला भेटायला आले होते?

कोण होते मनसुख हिरेन?
– गाद्यांच्या रिसेल व्यापारातील ठाण्याचे हे रहिवासी. अनेक राजकीय पक्षांसोबत जवळचे संबंध. पट्टीचे पोहणारे म्हणून ओळख. ४ मार्चला घरातून निघाले. तेव्हापासून बेपत्ता.

कोण आहेत सचिन वाझे?
– १९९०च्या बॅचचे हे वादग्रस्त पोलिस अधिकारी. ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित. या काळात शिवसेनेत प्रवेश. १६ वर्षांनंतर पुन्हा सेवेत. कंगना प्रकरणाची चौकशी आणि अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात महत्त्वाची भूमिका होती.


Back to top button
Don`t copy text!