स्थैर्य, पांचगणी, दि. 25 : निसर्ग आपल्याला केव्हा आणि कसा अचंबित करेल हे सांगता येत नाही.या वर्षी जून महिन्यातच पर्यटननगरी पाचगणी व परिसरातील टेबललँडवरील पठारे ऑर्किडच्या पाढंर्या शुभ्र रानफुलांनी बहरली आहेत. त्यामुळे डोंगर पठारावरील सृष्टीसौंदर्य खुलले असून, निसर्गाचा पुष्पमहोत्सव पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अनेक प्रकारच्या मोसमी रानफुलांना बहर येतो. या फुलांना वेगवेगळे रंग, आकार आणि गंध लाभलेले असतात. पावसाळ्यात रानवाटांवर, कडेकपारींवर आणि पठारांवर उमलणारी रानफुलं ही मोसमी असतात. त्यांचा बहर पावसाशी निगडित असतो. त्यातल्या काही फुलांचा बहर एक वा दोन दिवसांचा असतो तर काहींचा सात-आठ दिवसांचा असतो. या रानफुलांपैकी लक्षवेधी फुलं म्हणजे ऑर्किड. कारण या फुलाच्या जवळपास 400 प्रजाती जमिनीवर वाढतात. ऑर्किड फुलांच्या सर्व जाती अत्यंत नाजूक असतात. डोंगराळ भागात भरपूर पर्जन्यवृष्टी होणार्या भागात या फुलांचे प्रमाण सर्वाधिक असते.या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने पडलेला पाऊस व त्यातच मान्सूनच्या आगमनाचा पाऊस यामुळे यावर्षी जून महिन्यातच पाचगणी व परिसरातील टेबललँड पठार ऑर्किडच्या पाढंर्या शुभ्र रानफुलांनी बहरले आहे. पठारावर आल्यावर जणू आकाशातील पांढरे शुभ्र चांदणे पृथ्वीवर आल्याचा भास होत आहे.