दैनिक स्थैर्य | दि. २९ जानेवारी २०२४ | भोपाळ |
भागवत सांप्रदायात संत ज्ञानेश्वर व संत नामदेव महाराज यांचे स्थान महत्त्वपूर्ण असून यांनी महाराष्ट्रासह उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला, असे मत भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी व्यक्त केले.
मध्य प्रदेश सरकारच्या जनजातीय लोककला एवं बोली विकास अकादमी संस्कृती परिषदेच्या वतीने भोपाळ येथील रवींद्र भवनमध्ये ‘सांस्कृतिक परंपरेत साधू व सन्यासी’ या विषयावर तीनदिवसीय शोध संगोष्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या संगोष्टीचे उद्घाटन अयोध्याचे आचार्य मिथिलेशनंदन शरण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. मनोज श्रीवास्तव हे होते.
प्रास्ताविकात या संस्कृती परिषदेचे संचालक डॉ. धर्मेंद्र पारे यांनी शोध संगोष्टीच्या आयोजनाची माहिती देवून भारतीय साधू, संत, संन्यासी यांनी भारतीय संस्कृती व परंपरा पुढे नेण्याचे व त्यास दिशा देण्याचे काम केल्याचे सांगितले.
आचार्य मिथिलेशनंदन शरण म्हणाले, प्रभू श्रीरामांना समजून घ्यायचे असेल तर त्यांच्यातील साधूत्व समजून घेतले पाहिजे. महाबली रावणातील अहंकार संपविण्यासाठी त्यांनी अयोध्या ते श्रीलंका अशी यात्रा केली. आजही भारतात अशा प्रकारच्या यात्रा करून आपल्यातील अहंकार घालविण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून भारतातील साधू, संन्यासी यांचा आदर्श घेवून आपण यात्रा केली पाहिजे. यात्रेने मनोबल वाढते, अहंकार नष्ट होतो.
या तीन दिवसीय शोध संगोष्ठीमध्ये भारतातील विविध राज्यातील ४३ विद्वानांनी आपले विचार मांडून ‘सांस्कृतिक परंपरेत साधू व संन्यासी यांचे योगदान’ या विषयावर मंथन केले.