दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । सातारा जिल्ह्यातील गट सचिवांचे महत्वाचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. यामध्ये पगार व महागाई भत्ता वाढीचा महत्वाचा मुद्दा होता. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि केडरचे अध्यक्ष आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी क्रांतिकारी निर्णय घेऊन दिवाळीपूर्वीच गट सचिवांचे प्रश्न मार्गी लावून गट सचिवांची दिवाळी गोड केली. याबद्दल गट सचिव आणि केडर कार्यालयाच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानण्यात आले.
सातारा जिल्ह्यामध्ये २४८ सचिव असून हे सचिव विविध विकाससेवा सोसायट्यावर कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गट सचिवांची पगारवाढ, महागाई वाढ आदी प्रश्न प्रलंबित होते. या मागण्या सोडवण्याबाबत संघटना व जिल्हा केडर कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती. दिवाळीपूर्वी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जिल्हा बँकेचे मुख्य व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या उपस्थितीत गट सचिव, केडर कार्यालयाचे पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीत गट सचिवांच्या रास्त मागण्या मान्य करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतले.
गट सचिवांच्या महागाई भत्त्यामध्ये ७५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच पगार वाढीसह मेडिक्लेम व इतर अन्य महत्वाचे प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मार्गी लावून गट सचिवांची दिवाळी गोड केली. याबद्दल गट सचिव आणि जिल्हा केडर कार्यालयाच्यावतीने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले. यावेळी मकरंद भोसले, जालिंदर पवार, रघुनाथ तळेकर, खटावचे विजय चव्हाण, कोरेगावचे शंकर साळुंखे, सुनील झांजुर्णे, पाटणचे प्रकाश साळुंखे, फलटणच्या कमल इंगळे, वाईचे संतोष शिर्के, कराडचे प्रकाश पाटील, सुहास शिर्के, जावलीचे बापूराव धनवडे, हणमंत मोहिते आदी उपस्थित होते.