
दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । वाई । अंगणवाडी सेविका, महिला मदतनीस, पर्यवेक्षिका, कार्यालयीन महिला कर्मचारी यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहेत, ते लवकरच मार्गी लावणार महिला व बालविकास राज्य मंत्री यशोमती ठाकूर यांनी वाईत बोलताना दिली.
शनिवार (दि. १९ ) प्रतापगडावर साजरा होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जात असताना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार रणजीत भोसले, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, किसनवीर सहकारी कारखान्याचे संचालक रतनसिंह शिंदे, महाराष्ट्र प्रदेश सचिव जयदीप शिंदे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र भिलारे, युवकचे तालुकाध्यक्ष प्रमोद अनपट, खंडाळा युवकचे तालुकाध्यक्ष अतुल पवार, कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा अल्पनाताई यादव, वाई पंचायत समिती सदस्या ऋतुजा शिंदे, उपाध्यक्ष कल्याणराव पिसाळ, सरचिटणीस राजेंद्र पाडळे, राजेंद्र यादव, अन्सार मुजावर, फैयाज बागवान, नारायण गोसावी, सचिन वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून वाई तालुक्यामध्ये स्वतंत्र महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी मंजूरी घेण्यात आली आहे.येत्या अधिवेशनात सभागृहासमोर ही मागणी लावून धरणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विराज शिंदे म्हणाले, वाई तालुक्यात कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढत असून तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी पक्षाच्या वरिष्ठ पाठीवरून खंबीर साथ मिळण्याची गरज आहे, राज्यातील कॉंग्रेस पक्षाकडे महिला व बालविकास मंत्रालय असून आपल्या माध्यमातून शासनाच्या स्मार्ट अंगणवाडी योजनेंतर्गत चालू वर्षात अंगणवाडीसाठी १०० डिजिटल संच उपलब्ध करून द्यावेत, अंगवाडी सेविकांची रिक्त पदे १०० टक्के भरावीत, मानधन व वेतन वेळेतच व्हावे, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला व बालविकास भवन असावे, यासारखे महिलांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यास कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढण्यास मदत मिळणार आहे, यावेळी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने शौकतभाई पठाण यांनी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांच्या मदतीने यशोमती ठाकूर यांना पोषण आहारा संबंधी लेखी निवेदन दिले.
वाई तालुक्यात कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अतिवृष्ठीमुळे भूस्खलन होवून मोठी आपत्ती कोसळली होती, यावेळी उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता नागरिकांना लागणारी सर्वप्रकारची मदत केली. तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी धावून जाणारे व्यक्तिमत्व विराज भैया शिंदे असून कॉंग्रेस पक्षाचे भविष्यात वाई तालुक्याचे आमदार पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावेत. तालुक्यातील मतदार कॉंग्रेस पक्षाला नक्कीच साथ देतील अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद अनपट व तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ठाकूर यांच्याकडे केली.