सध्याच्या कोरोना परिस्थितीनुसार पालखी सोहळा पायी नसावा; फलटणचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २७ : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या संख्येवर सापडत आहेत. कोरोनाची फलटण शहरातील परिस्थिती हि भयंकर व भीतीदायक आहे. फलटण शहर व परिसरात कोरोनाबाधित रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले आहेत व येत आहेत. फलटण शहरासह तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झालेले आहेत. हि सर्व परिस्थिती लक्षात घेता यंदा सुद्धा आषाढी वारीचा पालखी सोहळा हा पायी नसावा, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्राद्वारे पाठवलेली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून बंद असलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का ? गावात कोरोनाची परिस्थिती कशी आहे ? याबाबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे वतीने पालखी मार्गावरील गावांना पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. त्यानुसार फलटण नगरपालिकेस दि. १६ मे २०२१ रोजी लिहलेले पत्र प्राप्त झालेले होते. त्या पत्रानुसार फलटण नगर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला फलटण शहरासह परिसरातील कोरोनाची सद्यस्थिती निदर्शनास आणून दिलेली आहे.

सध्याची कोरोनाची परिस्थिती जर आहे अशीच राहिली तर पायीवारी करणे हे ग्रामस्थ, भाविक व वारकरी यांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल. त्या मुळे गतवर्षीप्रमाणे एस.टी. तुनच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणे योग्य राहील. सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता फलटण शहरात एकही वारकरी येणे योग्य व सुरक्षित वाटत नाही. ज्या वेळेस कोरोनाची परिस्थिती सुधारेल त्या वेळेसच पायी पालखी सोहळ्याबाबत मत व्यक्त करणे हे उचित ठरेल, असेही फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी पत्रात स्पष्ट केलेले आहे.

सध्याची कोरोनाची परिस्थिती आहे अशीच राहिली तर आम्ही फलटण शहरातील पालखी तळावर कोणतीही सुविधा नगरपालिका देऊ शकणार नाही. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊन पूर्ववत झाली तर नेहमीप्रमाणे सुविधा देणे नगरपालिकेला शक्य होईल, असेही फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी पत्रात स्पष्ट केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!