स्थैर्य, सातारा, दि. 14 : ठोसेघरकडे जाणार्या मार्गावरील बोरणे घाटात पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री दरड कोसळली असल्याने शुक्रवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, वाहनचालकांसह प्रवाशांनी छोठे-छोठे दगड हटविल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली असून, मोठमोठे दगड अद्याप रस्त्याच्या मधोमधच असल्याने ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.
परळी, ठोसेघर, कास परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, पावसामुळे आता अनेक ठिकाणी दरडी, झाडे कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. गुरुवारी मध्यरात्री ठोसेघरकडे जाणार्या मार्गावरील बोरणे घाटात दरड कोसळली असून, या दरडीमध्ये मोठेमोठे दगडही रस्त्यावर आल्याने शुक्रवारी सकाळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
सकाळी चाळकेवाडी पठारावरील पवनचक्कीच्या कर्मचार्यांना घेऊन जाणारी बस तेथे पोहोचली आणि त्या बसमधील सात-आठ कर्मचार्यांनी व इतर वाहनचालकांनी रस्त्यावरील छोठे-छोठे दगड हटवून एकेरी वाहतूक सुरू केली. मोठमोठे दगड अद्याप रस्त्याच्या मधोमधच असल्याने ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत तरी बांधकाम विभागाने तत्काळ मोठमोठे दगड हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहनधारकांसह प्रवाशातून होत आहे.