स्थैर्य, श्री क्षेत्र आळंदी दि. २४ : मानवाचा देह हे परमेश्वराचे मंदिर आहे . हे एक क्षेत्र आहे आणि त्याला जाणनारा क्षेत्रज्ञ होय . क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जो यथार्थपणे जाणतो तोच उत्तम ज्ञानी असतो असे ह भ प बंडू उर्फ विनायक महाराज चौगुले यांनी सांगितले.
आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफ एम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( गुरुवार ) तेराव्या दिवशी कोची जि कोल्हापूर येथील ह भ प बंडू उर्फ विनायक महाराज चौगुले यांनी प्रकृतिपुरुषविवेकयोग या तेराव्या अध्यायावर सुरेख निरुपण केले .
तरि क्षेत्र येणें नांवे l हे शरीर जेणे भावे ll
म्हणितले ते आघवे l सांगो आता ll
ह भ प चौगुले महाराज म्हणाले , देह हा नश्वर आहे . या देहात जो पर्यंत आत्मा आहे तो पर्यंतच त्याचे मुल्य आहे . आत्मा निघून गेला की त्या देहाला क्षणभरही कोणी घरात ठेवत नाही . हे विश्व म्हणजे क्षेत्र होय तर या क्षेत्राचे पालन करणारा पांडुरंग परमात्मा हा क्षेत्रज्ञ होय . यंदा आषाढी वारी रद्द झाल्याने या क्षेत्रज्ञाचे दर्शन आपणाला दुर्लभ झाले आहे . त्यासाठी मानसपूजा , आराधना नामस्मरण करुन या परमात्म्याला आपलेसे करा . पंढरीचा वारकरी कधी ज्ञान विज्ञानाच्या मागे लागत नाही . त्याला शाश्वत सुख कुठे भेटते हे माहित असल्याने तो श्रध्देने पांडुरंगाचे स्मरण करतो.
आंधळ्या पांगळ्याचा एकच विष्णुदाता आणि तो म्हणजे पांडुरंग होय . संतांचा सहवास लाभला की परमेश्वर प्राप्ती होते . साखर कोठेही व कशातही असली तरी आपला गुणधर्म बदलत नाही . तसे ज्ञानेश्वरीचे आहे . ती वाचकाला कायम ग्रंथरुपातुन साखरेची गोडी अनुभवावयास देते . शरीरामध्ये जो पर्यंत चैतन्य आहे तो पर्यंतच परमार्थ आहे . एकदा चैतन्य संपले की सर्वकाही संपते . ज्याच्याकडे समत्व भाव आहे त्याची दृष्टी निकोप असते . असा समत्व भाव ठेवणारा भक्त भगवंताला प्रिय असतो . या कार्यक्रमाचे निवेदन ह भ प स्वामीराज भिसे यांनी केले.
आज शुक्रवार दि . २६ जून रोजी येथील ह भ प कृष्णा महाराज चवरे हे सायंकाळी ४ वाजता ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या ” गुणातीतयोग ” या चौदाव्या अध्यायावर निरुपण करतील .
दरम्यान गुरुवारी पहाटे श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली . यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले . रात्री डांगे पंचमंडळी यांच्या वतीने कीर्तनाची सेवा तर रात्री नांदेडकर दिंडीच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .