जनजागृती व मोफत औषधोपचार यामुळे एड्सच्या रुग्णांची संख्या घटली – डॉ. चंद्रशेखर जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाने १९९२ साली एड्स आजाराच्या रुग्णास मोफत औषध पुरवठा करणे, हा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे १९९२ च्या निर्णयामुळे मोफत औषध उपचार पुरवून माणसाचे जीवनमान उंचावण्याचे काम शासनाने केले आहे. अशाप्रकारे एड्स रोगाविषयी झालेली जनजागृती व आयुष्यभर मोफत औषधोपचार यामुळे एड्सच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे प्रतिपादन फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ मेडिकल ऑफिसर डॉ. चंद्रशेखर जगताप यांनी केले.

मुधोजी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना तसेच रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिक एड्स दिन जनजागृती’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर पवार सर होते.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अ‍ॅड. अशोक शिंदे, रेड रिबन क्लबचे चेअरमन प्रा. अक्षय अहिवळे, प्रा. किरण सोनवलकर, प्रा. डॉ. अभिजीत धुलगुडे यांची उपस्थिती होती.

मनोगतामध्ये डॉ. चंद्रशेखर जगताप पुढे म्हणाले की, ए. आर. टी. प्रणालीच्या औषधांमुळे व्यक्तीच्या रक्तामधील पांढर्‍या पेशींची ताकद वाढवली जाते. प्रथम ताकद कमी असल्याने गुप्तरोग, बारिक ताप, रक्त कमी होणे असे विकार जडतात. प्रत्येक महिन्याला एड्सच्या रुग्णास औषधोपचारासाठी सहा ते सात हजार रुपये खर्च येत होता; परंतु शासनाच्या नियमानुसार रुग्णास ही औषधे मोफत दिली जातात. यामुळे माणसाचे जीवनमान उंचावले आहे. याप्रसंगी आय. सी. टी. सी. समुपदेशक सौ. विशाखा पलूसकर यांनी एड्स हा रोग असुरक्षित रक्तपुरवठा, असुरक्षित लैंगिक संबंध, गरोदर अवस्थेत आईला झालेला एड्स विकार, लग्नानंतर पहिल्या बाळंतपणाच्यावेळी अज्ञानामुळे न केलेली वैद्यकीय तपासणी, यामुळे होतो. त्याचप्रमाणे मोबाईल फोन, चाट, जीपीटी इतर साधनांमुळे तरुणांच्या भावना चाळविल्या जातात, तरी तुम्ही असले पाप करू नका. लग्नामध्ये कुंडली जुळविण्याच्या मागे न लागता एड्सची तपासणी करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. प्रभाकर पवार म्हणाले की, सन १९८८ ते १९९४ अखेर हा भयानक रोग दारापर्यंत कधी पोहोचला, ते कळलेदेखील नाही. ड्रायव्हरच्या गावावर बहिष्कार टाकण्यात आले. या संकटात भारताने मोठे काम केले. डॉक्टरांचे योगदान मोठे होते. एड्स निर्मूलनाच्या चळवळीमुळे भीती कमी झाली. माणसाने मदत घेताना काळजी घ्यावी. जगाबरोबर आपण जगलं पाहिजे.

या कार्यक्रमास मुधोजी ज्युनियर कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एम. एस. शिंदे, प्रा. सौ. नीलम देशमुख, प्रा. भोसले, प्रा. सौ. शिंदे व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक डॉ. अ‍ॅड. अशोक शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. अभिजीत धुलगुडे यांनी केले तर आभार रेड रिबीन क्लबचे चेअरमन प्रा. अक्षय अहिवळे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!