पुन्हा एकदा क्रांतीच्या मशाली पेटवण्याची गरज

प्रा.डॉ. भास्करराव कदम;’ विद्रोही ’ कडून क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन


सातारा – क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त बोलताना प्रा.डॉ. भास्कर कदम  शेजारी कॉ.विजय मांडके, अ‍ॅड. कॉ. वसंत नलावडे, राहुल गंगावणे.

दैनिक स्थैर्य । 5 ऑगस्ट 2025 । सातारा । महाराष्ट्राच्या पुरोगामी म्हणून असणार्‍या ओळखीला छेद देणार्‍या घटना घडू लागल्याने आजच्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचे काय ? समाजवादाची सोपी व्याख्या लोकांपर्यंत पोहोचवणारा, प्रतिसरकारची स्थापना करणारा आणि संसदेत शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आवाज उठवणार्‍या या नेत्याने पाहिलेली स्वप्ने अजूनही प्रत्यक्षात आली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा क्रांतीच्या मशाली पेटवण्याची गरज असल्याचेही मत प्रा. डॉ . भास्करराव कदम यांनी केले.

सातारा येथील शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या (सुटा) कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र च्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सिटूचे नेते कॉ.वसंत नलावडे होते. यावेळी विचार मंचावर कॉ. विजय मांडके उपस्थित होते.

डॉ. भास्करराव कदम म्हणाले, शिव, शाहू, फुले ,आंबेडकरांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या अनेक समाजसुधारक व स्वातंत्र्य सेनानींनी प्रबोधन चळवळ राबविली. याच महाराष्ट्राची पुरोगामी राज्य म्हणून असणारी ओळख पुसली जाणार की काय ? अशी भीती वाटू लागली आहे. इतिहासाची जाण नसल्याने आजची तरुण पिढी ही बुद्धिभ्रंश झाल्यासारखी वागत आहे. त्यांनी इतिहासाचे नीट आकलन करून घेणे गरजेचे असल्याचे सांगून डॉ.कदम यांनी नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील समाजप्रबोधन, स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय चळवळीतील त्यांच्या विविध विचार वाटेने झालेल्या प्रवासाचा धावता आढावा घेतला.

कॉ.वसंत नलावडे म्हणाले, नाना पाटील यांनी अवगत केलेली वक्तृत्व शैली विशेष म्हणावी लागेल. अवघड गोष्टी सोप्या भाषेत उघड करून सांगत त्यांनी केलेले प्रबोधन महत्त्वाचे ठरते. आता पुढील काळात नाना पाटील यांना स्मरून विद्रोहाद्वारे क्रांतीकडे जावे लागेल आणि तसा लढा तीव्रपणे उभा करावा लागेल.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी सम्यक विद्रोहीच्या प्रसिद्ध केलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्रोही सांस्कृतीक चळवळ महाराष्ट्राचे प्रवक्ते कॉ. विजय मांडके यांनी स्वागत – प्रास्ताविक केले. प्रा राहुल गंगावणे यांनी सूत्रसंचालन केले. शुभम ढाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. डॉ.विजय माने, सुनील गायकवाड, बाबुराव शिंदे , डॉ .पल्लवी साठे – पाटोळे, अमोल पाटोळे, दिलीप भोसले , अबू शेख, नितनवरे तसेच विद्रोहीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!