दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । आटपाडी ।
हिंदु – मुसलमान दोघाला
केला आलावा खेळायला
दहा दिवसाला,
अशा अनेक रिवायतीद्वारे शेकडो वर्षापासून शांती, समता, एकता, बंधुता आणि सदाचाराचा संदेश देण्याचे काम पिढ्यान पिढ्या सर्व धर्मीय आटपाडीकर आणि तालुकावाशीय करीत आल्याची साक्ष गावोगावी मोहरमचा उत्सव देत असतो . तो आजही देतो आहे आणि यापुढेही देत राहील अगदी, ता कयामत तक म्हणजे सृष्टीच्या अंतापर्यत…….. एवढे मात्र खरे .
आटपाडीचा मोहरम तसा जगापेक्षा वेगळ्याच धाटणीचा . आपल्याच चालीचा, रीतीचा आणि वाटचालीचा . इराक मधील कर्बला येथे १४०० वर्षापूर्वी भ्रष्ट वृत्तीच्या , खोट्या, व्यभिचारी, हुकुमशाह यजिदच्या प्रचंड अन्याया विरोधात त्याग, सच्चाई, शांतता, मानवतेसाठी झालेल्या लढाईत इमाम हुसेन आणि त्यांच्या परिवाराला शहीद व्हावे लागले . जिंकलेल्या क्रुरकर्मा यजिद चे पुढच्या शेकडो वर्षात नामोनिशान ही मिटून गेले . तथापि आपल्या सर्वोच्य बलिदानातून सारे जहाँत अमर झालेल्या इमाम हुसेन आणि त्यांच्या परिवाराच्या त्यागाची प्रखर आठवण करून देणारा पवित्र मोहरमचा सण, जगातल्या करोडो गावात त्या त्या ठिकाणी पूर्वांपारच्या विविध प्रकार, चाली परंपरेनुसार साजरा होत असतो. मोहरमच्या दहा दिवसात, पवित्र कुराणचे पठण, नमाज, रोजे, दरुद शरीफ, फातिहा पठण शरबत, चोंगे, रोट यांचे वाटप वगैरे मोठ्या प्रमाणात करून शहिदांसाठी दुवाँ मागीतली जाते . ही सर्वत्रची मोहरमची मुख्य उपासणा पद्धती . तथापि भारतातल्या लाखो गावात मोहरम निमित्त बसविले जाणारे ताबुत, पंजे, सवारी वगैरे च्या निमित्ताने सर्व *गावच* याला जोडले जाते . मोहरमच्या १ तारखेपासून सुरु होणारी या उत्सवाची सुरवात, गावचे देशमुख, पाटील, इनामदार, जहागीरदार, अठरा पगड जातीत विभागला गेलेला बहुजन, अलुतेदार बलुतेदार पद्धतीतील शेकडो जणांना, एकाच ठिकाणी आणणारा, विविध प्रकारातून व्यक्त केला जाणारा, फातीहा, दरुद, दुवाँ मागताना सर्वांनाच जात – पात, उच – नीच, गरीब – श्रीमंत असा भेदभाव विसरायला भाग पाडणारा, सर्व मानव जात एकच आहे . सर्वांचा विधाता एकच आहे, हे सांगणारा आणि सर्वांना भक्ती – श्रध्देच्या तालासुरावर एकत्र जोडणारा, प्रसंगी नाचवणारा हा मोहरम, आटपाडीची शान बान आणि आन ठरलेला आहे . या मोहरमला खरा राजाश्रय दिला आहे – तो रयत आपली मानणा-या देशमुख – पाटील – देशपांडे – इनामदार वगैरे इनामदारांनी . फकीरी म्हणून जमणाऱ्या विविध पदार्थ, साहित्या बरोबर आर्थिक डोलाऱ्यात याच मानकऱ्यांनी मोठा हात दिलेला असतो . दर हजारी पन्नास इतके अत्यल्प प्रमाण असणाऱ्या आटपाडी तालुक्यातील अनेक गावच्या मुस्लीमांवर इतर धर्मीय बांधवांनी नेहमीच मोठे औदार्य प्रेम दाखविले आहे आणि या मुठभर मुस्लीमांना आणि विशेषत : आटपाडीतल्या मुस्लीमांना सर्वात मुख्य आधार नेहमीच देण्याचे काम खानापूर आटपाडी तालुक्याचे नेते कै . बाबासाहेब देशमुख यांच्या पुर्वजांनी केल्याचे सर्वश्रूत आहे. जाती – पाती – धर्मापलीकडचे नाते जपणाऱ्या या देशमुख घराण्याने विविध जाती,जमाती, धर्माचे, उत्सव ,सण, जत्रा, खेत्रा सह विविध मान्यवरांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करताना नेहमीच आघाडीचीच भूमिका पार पाडलेली आहे . लागेल ती आणि मागेल ती मदत देण्यात या घराण्याने कधी हात अखडता घेतला नाही . सर्वच जण गुण्यागोविंदाने नांदावेत, प्रत्येकाने एकमेकाचे सुखदुख जाणावे, एकामेकांसाठी मदतीस यावे आणि कसल्याही भेदभावाविना ही इन्सानियत सतत तेवत रहावी . शांती – समता – बंधुता यातूनच सर्वजण सुखी – समाधानी व्हावेत एवढ्याच माफक अपेक्षेने माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, त्यांचे बंधू संजयकाका देशमुख आणि अमरसिंहबापू देशमुख या बाबासाहेबांच्या सुपुत्रांनी सर्वच ठिकाणी मदतीचा हात पुढे केला आहे . हर्षवर्धन, राजवर्धन आणि दिग्विजय ही बाबासाहेबांची तीन नातवंडे, आटपाडी तालुक्यातल्या धार्मिक सलोख्यासाठी सदैव प्रयत्न करताना दिसत आहेत . द्वेषाच्या धार्मिक ध्रुवीकरण, राजकारणा पासून तरुणाई दुर राहीली पाहीजे म्हणून हे उगवते नेते बाबासाहेबांच्या कार्याची आठवण करून देत आहेत .
आधुनिकीकरण, यांत्रिणीकरण, वगैरे प्रगत वाटचालीमुळे सर्वच उत्सवांना मर्यादा पडताना दिसत असताना सुद्धा, आपण येथे इमाम हुसेन साहेबांचा ताबुत खांद्यावर घेतला तर कोण काय म्हणेल, इस्लामी टोपी परिधान केली, आपल्या मुस्लीम भावांसमवेत शहीद हुसेन साहेबांच्या हौतात्म्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या वाटचालीचा जयजयकार केला , प्रसंगी समता बंधूता दर्शविण्यासाठी मागेपुढे शेजारी पाजारी कोण आहे हे न पाहता मान मरताब सर्व विसरून ईश्वराचीच सर्व लेकरे असल्याचे दाखवताना ढोल ताशांच्या तालावर नाचलो तर आपले काय होईल , याचा साधा लवलेशही मनी न आणता राजेंद्रआण्णांसह सर्व भावंडांनी आणि त्यांच्या लेकरांनी मोहरम मध्ये सहभागी होत पाण्यासारखे स्वच्छ पारदर्शक अंतकरणाचा प्रत्यय आणून दिला आहे . हे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही . घराशेजारीची चार लोक ही विचारीत नाही अशांनी, कोणत्याही कार्यक्रमात फेटा मिळणार ना ! हार घालणार ना ! माईकवरून नावाचा वारंवार डंका वाजवणार ना ! फोटो – शुटींग करणार ना ! पेपर – पोर्टल वर छापून आणणार ना ! अशा अपेक्षांचा भडिमार करणाऱ्यांच्या जमान्यात, रंगात रंगणारा,एकता बंधू भावात दंग राहणारा श्रीरंग, राजेंद्रनाथांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे . निस्पृह, निरागस, निरपेक्षतेची साक्ष देत जातीभेदाचा चिखल तुडवत मोहरमच्या ताबुत पुढे नाचणारा, आमचा सर्वांचा नाथ अर्थात नाथाजीराव म्हणजे राजेंद्रआण्णा देशमुख हेच खरे आटपाडीच्या मोहरमचे खरे आदर्श वाटतात. हा माझा भारत आहे , आम्ही सर्व भारतीय भाऊच आहोत , याचा पदोपदी प्रत्यय आटपाडीतला प्रत्येक उत्सव – सण – सभा – समारंभ देतच असतो. आटपाडीचा मोहरम त्याचेच गोड उदाहरण !