
स्थैर्य, सातारा, दि.४: शहरातील जुन्या दौलत टॉकीजसमोरील मोकळ्या जागेत शनिवारी दुपारी सुनील नंदकुमार घोरपडे वय 48, रा. सायगाव (एकंबे) याच्या खूनप्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत उलगडा केला आहे. कोरेगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या संयुक्त तपासामध्ये संशयित विजय उर्फ दाजीबा संजय नालट वय 30, रा. बुरुडगल्ली, कोरेगाव याला अटक करण्यात आली आहे.
दौलत टॉकीजसमोरील मोकळ्या जागेत सुनील नंदकुमार घोरपडे व आनंदा बाळू जाधव हे शनिवारी दुपारी दारु पिण्यासाठी एकत्र बसले होते. त्यांच्या शेजारीच विजय उर्फ दाजीबा संजय नालट हा देखील दारु पीत बसला होता. घोरपडे व जाधव यांनी नालट याच्याकडे दारुमध्ये मिसळण्यासाठी पाणी मागितले, मात्र त्याने मला पाणी कमी आहे, मी देणार नाही, असे सांगितले. त्याचा राग आल्याने दोघांनी नालट याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. कारण नसताना मारहाण केल्याच्या रागात नालट जागेवरुन उठला आणि त्याने टॉकीजच्या परिसरात असलेल्या विहिरीजवळून लाकडी दांडके शोधून आणले आणि लाकडी दांडक्याने दोघांच्या डोक्यात मारहाण केली. घोरपडे व जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर नालट हा तेथून निघून गेला. कोरेगाव पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल व ऋतुजा खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे व उपनिरीक्षक विशाल कदम यांना सूचना दिल्या होत्या. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्ह्याचे गार्ंभीय लक्षात घेऊन आपले पथक तपासकामी रवाना केले होते.
शनिवारी सायंकाळपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे व उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी अमोल सपकाळ, अमोल कणसे, किशोर भोसले, अजित पिंगळे, हेमंत शिंदे, समाधान गाढवे, प्रशांत लोहार, अतुल कणसे, महेश जाधव, अजय गुरव, तुषार बाबर यांच्या पथकाने संशयितांकडे चौकशी सुरु केली होती, तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार सुधीर बनकर, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, विजय सावंत यांनी संशयितांची धरपकड करत प्रमुख संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विजय उर्फ दाजीबा संजय नालट याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने अत्यंत कौशल्यपूर्णपणे प्रश्नांचा भडीमार केला, त्यावेळी खुनाची आणि खुनी हल्ल्याची कबुली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.