स्थैर्य, सातारा, दि.१५: सातारा शहरातील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरच्या उदघाटनाचा शासकीय घाट घातला जात आहे . जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची तारीख घेऊन ग्रेड सेपरेटरचे उदघाटन लवकरच केले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिली.
जिल्हाधिकारी सिंह यांनी काेविड 19 याच्या लसीकरणाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली हाेती.
त्यावेळी माध्यमांतील प्रतिनिधींनी ग्रेड सेपरेटरमधील त्रुटींबाबत जिल्हाधिकारी सिंह यांना माहिती दिली. त्यानंतर ग्रेड सेपरेटरचे उदघाटन कधी केले जाणार या प्रश्नावर लवकरच उदघाटन केले जाणार असल्याचे सूतोवाच शेखर सिंग यांनी केले . पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करुन तारीख ठरवली जाईल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .
ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उदघाटनाची पुन्हा चर्चा
या कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बाेलावणार आहात अशी चर्चा आहे. आय कान्ट कमेंट असे स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले . दरम्यान आठ जानेवारीस खासदार उदयनराजे भाेसले यांनी ग्रेड सेपरेटरचे उदघाटन केले हाेते. मात्र पाहणीचे निमित्त करून झटपट उद्घाटनच करण्यात आले तेव्हा कोणत्याही शासकीय कार्यालयाला याची कल्पना नव्हती . मात्र ग्रेड सेपरेटरच्या शासकीय थाटाच्या उद्घाटनाच्या वृत्ताने सातारकरांच्या मध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली आहे . ग्रेड सेपरेटरला अंर्तगत सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य सुविधा देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची ग्वाही शेखर सिंग यांनी दिली आहे .