‘आयआरसीटीसी’मधील हिस्सा मोदी सरकार विकणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दोन दिवसांत शेअर ७ टक्क्यांनी घसरला


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१०: केंद्रातील मोदी सरकारने खासगीकरणाचा धडाकाच लावला आहे. बँक, रेल्वे आणि विमानतळ यानंतर आता मोदी सरकार इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमधील आपला हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मधील १५ ते २० टक्के हिस्सा ऑफर ऑफ सेल्स म्हणजेच ओएफएसच्या माध्यमातून विकण्याची केंद्र सरकारची योजना आहे. या वृत्तामुळे आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांनी घट झाली आहे.

आठवड्याच्या तिस-या दिवशी शेअर मार्केटमध्ये आयआरसीटीसीचा शेअर १३३० रुपयांवर दिसत होता. यापूर्वी मंगळवारी आयआरसीटीसीचा शेअर २.५७ टक्क्यांनी घसरून १३७८.०५ रुपयांवर बंद झाला होता. त्यामुळे दोन दिवसांत शेअरच्या किंमतीत ७ टक्क्यांनी घट झाली आहे. मार्केट कॅपबाबत बोलायचे झाले तर ते २१ हजार कोटींच्या स्तरावर आहे.

वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (दीपम) अर्ज मागविण्यासाठी निविदा काढल्या आहेत. त्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र, आयआरसीटीसीचा किती भागभांडवल विकायचा आहे, याबाबत काहीच तपशील दिलेला नाही.

या बैठकीनंतर संभाव्य बिडर्सनी विचारलेल्या प्रश्नांवर दीपमने आपली उत्तरे पोस्ट केली आहेत. भागभांडवलावर दीपम म्हणाले की, ‘निदेर्शांक टक्केवारी १५ ते २० टक्के आहे. अचूक तपशील निवडलेल्या व्यापारी बँकेसोबत शेअर केला जाईल.’

दरम्यान, आयआरसीटीसीमध्ये सध्या सरकारची ८४. ४० टक्के भागीदारी आहे. सेबीच्या सार्वजनिक होल्डिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी सरकारला आपला हिस्सा ७७ टक्के पर्यंत आणावा लागेल.

याआधी सरकारने १५१ रेल्वे गाड्यांच्या १०९ मार्गावर खासगी कंपन्यांना प्रवासी गाड्या चालविण्याची परवानगी दिली आहे. या माध्यमातून सरकारला ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळण्याची अपेक्षा आहे. रेल्वेच्या एकूण नेटवर्कपैकी फक्त ५ टक्के खासगीकरण होणार आहे. या गाड्या १२ क्लस्टरमध्ये चालतील, ज्यात बंगळुरू, चंदीगड, जयपूर, दिल्ली, मुंबई, पटना, प्रयागराज, सिकंदराबाद, हावडा आणि चेन्नईचा समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!