मध्य प्रदेश सरकारने इंपिरिकल डेटा गोळा केला, तुम्ही अडीच वर्षे काय केले ते सांगा – भाजपाचे प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर यांचा सवाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२२ । मुंबई । मध्य प्रदेश सरकारने ४ महिन्यात ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला. केवळ एका तांत्रिक अडचणीमुळे मध्य प्रदेशात आरक्षणाविना निवडणूक घ्याव्या लागत आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने डिसेंबर २०१९ पासून इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी काहीही केलेले नाही. मध्य प्रदेशचे उदाहरण देण्याऐवजी आपण ओबीसी आरक्षणासाठी काय केले याचा हिशोब द्या, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिले. मध्य प्रदेश सरकारने या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करण्याचे जाहीर केले आहे, तर ठाकरे सरकार मात्र दोन वर्षे चालढकल करत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील आरक्षणाबाबतच्या निकालावरून पेढे वाटण्यापेक्षा महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा असेही श्री. टिळेकर  यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातील आरक्षणाची वस्तुस्थिती स्पष्ट असल्याने नाकर्त्या आघाडीच्या आनंदोत्सवावर विरजण पडणार आहे. महाराष्ट्रात इंपिरिकल डाटा गोळा करण्यात ठाकरे सरकारने दोन वर्षे चालढकल केली, ओबीसी आरक्षणासंबंधी आयोगाच्या कार्यकक्षा निश्चित करण्यातही ठाकरे सरकार कुचकामी ठरले. आपल्या प्रत्येक अपयशावर पांघरुण घालण्यासाठी दुसरीकडे बोटे दाखवून कातडी वाचविण्याच्या सवयीनुसारच आता ठाकरे सरकार मध्य प्रदेशातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपले अपयश लपवू पाहात असून, तेथील ओबीसी समाजाने आरक्षण गमावल्याचा आनंद ठाकरे सरकार लपवू शकत नाही यावरूनच ओबीसी आरक्षणाविषयीचा ठाकरे सरकारचा तिटकारा स्पष्ट होतो, असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच, महाराष्ट्रात ओबीसींना २७ टक्के जागांवर उमेदवारी देऊन त्यांना राजकीय न्याय देण्याची भूमिका भाजपने जाहीर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण पूर्णपणे रद्द केलेले नसून संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी कायम ठेवली असतानाही ठाकरे सरकार मात्र दोन वर्षे डोळ्यावर कातडे ओढून बेफिकीरी करत आहे. मध्य प्रदेशात राजकीय पक्षांना सर्वसाधारण जागांवरील उमेदवारीमध्ये ओबीसींना अंतर्गत आरक्षण देण्याची मुभा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. आघाडी सरकारमधील घटक पक्षांची ओबीसींना न्याय देण्याची इच्छा असती तर महाराष्ट्रात भाजपप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनेही अंतर्गत आरक्षण लागू केले असते. पण ठाकरे सरकार इंपिरिकल डाटाच्या घोळातच घुटमळत असल्याने अंतर्गत आरक्षण देण्याचीदेखील आघाडीची इच्छा नाही हेच स्पष्ट झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!