स्थैर्य,सातारा, दि ९ : पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) निरीक्षक सर्जेराव पाटील यांनीही सोलापूर ग्रामीणची वाट धरली. त्यामुळे जिल्ह्यातील एलसीबीच्या निरीक्षकाचे पद रिक्त झाले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारासाठी लागली होती त्याच ताकदीने एलसीबीच्या कारभारपणासाठी “फिल्डिंग’ लागली आहे.
पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात या शाखेच्या सक्षमीकरणाचे चांगले प्रयत्न झाले. त्या वेळी सीताराम मोरे यांनी शाखेच्या कारभाराच्या भूमिका चांगल्या पद्धतीने वठविली होती. त्यानंतर डॉ. अभिनव देशमुख व संदीप पाटील यांच्या काळात पद्माकर घनवट यांनी या शाखेचे कारभारपण पाहिले. त्यांनीही उत्तम प्रकारे या शाखेचे काम करत अनेक गुन्हे उघडकीस आणले. तेजस्वी सातपुते यांच्या काळात सुरवातीला विजय कुंभार यांनी एलसीबीचे काम पाहिले; परंतु काही काळात त्यांच्याऐवजी सर्जेराव पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला. मात्र, सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली. त्यांच्या पाठोपाठ सर्जेराव पाटील ही सोलापूर ग्रामीणला गेले. त्यामुळे एलसीबीचे निरीक्षक पद रिक्त झाले आहे.
अचानक झालेल्या या बदलामुळे एलसीबी इच्छुक असलेल्या अनेकांच्या मनोभावना चळावल्या गेल्या आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाचे असे हे पद मिळण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहे. महाविकास आघाडीच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये वर्णी लागण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून जशी चुरस लागली होती. अनेकांच्या माध्यमातून नेत्यांकडे शब्द टाकण्याची गळ घातली जात होती. त्याच पद्धतीने एलसीबीच्या कारभारपणासाठी जिल्ह्यात
व जिल्ह्याबाहेरून फिल्डिंग लागली आहे. पूर्वीच्या कामाचे दाखले, ज्येष्ठता, जिल्ह्यातील अनुभव अशा विविध परिमाणांची कसोटी त्यासाठी लावली जात आहे. आपलाच माणूस असावा यासाठी जिल्ह्यातील अनेक नेतेही त्यासाठी प्रयत्नशील आहेत.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर के. एम. एम. प्रसन्ना यांच्या प्रमाणेच जिल्ह्यातील अवैध धंद्ये पूर्णत: बंद करण्याचे आदेश देत आपली भूमिका स्पष्ट केली; परंतु काही पोलिस ठाणी वगळता अन्य ठिकाणी अद्याप ही भूमिका प्रभारी अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत पोचलेली दिसत नाही. त्यामुळे अधीक्षकांचा संदेश व्यवस्थित प्रत्येकापर्यंत पोचविण्यासाठी गरज आहे ती एलसीबीच्या सक्षम कारभाऱ्याची. प्रसन्ना यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एलसीबीच्या “कलेक्शन’वरही बोट ठेवले होते. सर्व “कलेक्शन’ बंद झाले पाहिजे, कोणीही पैशाची मागणी करू नका, तक्रार आली, तर चौकशी करून थेट बडतर्फ करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवायचा असेल, तर याच भूमिकेची आताही गरज भासणार आहे.
तारेवरची कसरत ही पात्रता!
जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाहता या कारभाऱ्याला राजकीय नेत्यांमध्येही योग्य समन्वय साधण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. अन्यथा पोलिसांच्या चांगल्या कामगिरीपेक्षा वाईट गोष्टींचाच गाजावाजा जास्त होऊ शकतो. त्यात आता गृहराज्यमंत्री पदही जिल्ह्यात आहे. त्यामुळे कारवाया व समन्वय अशी तारेवरची कसरत योग्य करू शकण्याची पात्रता असणाऱ्याचाच शोध पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना घ्यावा लागणार आहे.
महिन्यानंतर मुहूर्त
एलसीबीच्या निरीक्षक पदासाठी जोरदार फिल्डिंग लागली आहे. या पदावर तातडीने कोणाची तरी वर्णी लागणेही आवश्यक आहे; परंतु जिल्ह्यात नुकतीच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे ही आचारसंहिता संपल्यानंतरच निवड करण्याचा अधीक्षकांचा मनोदय आहे. त्यामुळे एलसीबीच्या कारभाऱ्याचा महिन्यानंतरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.