स्थैर्य, सातारा, दि. १३ : जिल्ह्यात यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 82.85 टक्के पेरणी झाली तर गतवर्षी याच दिवसात 50 टक्क्याच्या जवळपास पेरणी झाली होती. चांगल्या पावसामुळे यंदा पेरणी लवकरच पूर्ण होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोयाबीनची आतापर्यंत 106 तर बाजरीची 85 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने चांगली सुरुवात केली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला. विशेषतः पश्चिम भागातील पेरण्या लवकरच पूर्ण होतील, असे चित्र आहे. त्या तुलनेत पूर्व भागात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पेरण्यांना उशीर होत असला तरी दुष्काळी तालुक्यातील पेरणी सध्या 80 टक्क्यांच्यावर गेली आहे. फलटण तालुक्यात तर 101 टक्के पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख 16 हजार 701 हेक्टर आहे. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक सुमारे 64 हजार 9 हेक्टर असून, त्यानंतर सोयाबीनचे 63 हजार 754 आणि भाताचे 49 हजार 89 हेक्टर क्षेत्र आहे तर खरिपात भुईमुगाचे सर्वसाधारणपणे 38 हजार 227 हेक्टरवर पीक घेण्यात येते. ज्वारी 24 हजार 203, मका 18 हजार 598, नाचणी 5 हजार 887 हेक्टर घेण्यात येते. त्याचबरोबर जिल्ह्यात तूर, उडीद, मूग, इतर कडधान्ये, तृणधान्ये, तीळ, सूर्यफूल घेण्यात येते. चांगला पाऊस झाल्याने पेरणीने वेग घेतला आहे.
जिल्ह्यात 82.85 टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीची 67.72 टक्के पेरणी झाली आहे तर भाताची 65.32 टक्के क्षेत्रावर लागण झाली असून, सर्वाधिक पेरणी सोयाबीनची 106.14 टक्के क्षेत्रावर झालीय तसेच मका 63.80, भुईमूग 80.71, तूर 62.82 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरिपाच्या एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या 2 लाख 62 हजार 375 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.