
स्थैर्य,मुंबई, दि.२: भारतातील लोकप्रिय शोपैकी एक असणारा ‘द कपिल शर्मा 31 जानेवारीपासून बंद झाला आहे. 1 फेब्रुवारीला शो टिव्हीवर दाखवण्यात आला नाही. याबद्दल ‘द कपिल शर्माच्या शोमधील कलाकारांनी अगोदरच कल्पना दिली होती. मात्र, प्रेक्षकांकडून निरोप घेताना कपिलने कोणताही फिनाले ठेवला नाही यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. परंतू असेही सांगितले जात आहे की हा शो परत एकदा टीव्हीवर येऊ शकतो. पण यामध्ये शोचे जुनेच भाग दाखवले जातील. कपिलच्या शो अचानक बंद झाल्यामुळे बरेच प्रश्नही निर्माण झाले आहेत.
कपिलच्या शोचा ग्रँड फिनाले का झाला नाही? कपिल आणि चॅनल यांच्यात सर्व काही ठीक नाही की इतर काही कारणे आहेत अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. यापूर्वी कलर्सवरील कपिल शर्माचा शोही असाच अचानक थांबला होता. अलीकडेच एका चाहत्याने कपिलला शो बंद होण्याचे कारण विचारले होते त्यावेळी कपिल म्हणाला होता की, लवकरच आम्ही पुन्हा एकदा पालक बनणार आहोत त्यामुळे मला माझ्या पत्नीला वेळ द्यायचा आहे.
कपिलच्या शोमध्ये सलमान खान ते अक्षय कुमार यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले आहेत. अशा परिस्थितीत शो बंद होणार म्हटल्यावर चाहते निराश झाले आहेत. द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजसाठी त्याने एक-दोन नव्हे तर 20 कोटी रुपये घेतल्याचा दावा अभिनेता कृष्णा अभिषेकने केला होता. ‘द कपिल शर्मा’ शोच्या एका भागात कृष्णाने हा गौप्यस्फोट केला होता. मात्र, नंतर ही केवळ गंमत असल्याचं नंतर सांगण्यात होते.
कपिल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे, याची चर्चा सर्वत्र आहे. परंतु कपिल शर्मा डिजिटलमध्ये पदार्पणासाठी एवढी मोठी रक्कम घेणार आहे. हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला. कपिल शर्माच्या अनेक चाहत्यांनी याबद्दल कपिलला विचारण्याचा प्रयत्नही केला, मात्र कपिलकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. कपिल शर्मा त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी खरोखरच २० कोटी घेणार आहे का? याचे कुतूहल मात्र त्याच्या चाहत्यांना अजूनही आहे.