दैनिक स्थैर्य । दि. ०६ नोव्हेंबर २०२२ । पंढरपूर । कार्तिकी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी पढरीत आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याने आणि पंढरपूर नगरपरिषदेनेही यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करत असल्याचे लेखी पत्र दिल्याने आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारकाचा प्रश्न लवकरंच सुटण्याची आशा पल्लवीत झाली आहे. अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी यात्रेच्या पांडुरंगाच्या शासकीय महापुजेला पंढरपुरात यावे, अन्यथा आम्ही सर्व समाजबांधव व कार्यकर्ते चंद्रभागेत जलसमाधी घेऊ असा इशारा महर्षी वााल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला होता, या पार्श्वभुमीवर पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले की, चंद्रभागेच्या पात्रात कोणतेही नवीन पक्के बांधकाम करण्यास मनाई असल्याने हे काम थांबले असुन याबाबत लवकरात लवकर शासकीय परवानगी घेणेसाठीचा प्रस्ताव शासनाला सादर करणार असल्याचे लेखी पत्र नगरपरिषद प्रशासनाने दि. 3 नोव्हेंबर रोजी दिले आहे.
कार्तिकी यात्रेच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनाही एक निवेदन देऊन सदर स्मारकाची परवानगी आपणच मुख्यमंत्री असताना दिलेली असुन याबाबत पुढील कार्यवाही लवकर करावी व स्मारक उभारणीचेे काम सुरु व्हावे अशी मागणी केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शासनकाळात महादेव कोळी समाजाचे जातीचे दाखले मिळत होते, परंतु आपले शासन आल्यानंतर पुन्हा दाखले मिळणे बंद झाले असुन सदर दाखले मिळणेसाठीचे आदेश द्यावेत अशी मागणी केली. श्री.फडणवीस यांनी लवकरात लवकर ही दोन्ही काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासुनची आमची स्मारकाची मागणी पुर्ण होईल आणि जातीचे दाखले मिळण्यासही सुरुवात होईल, याची आशा पल्लवीत झाल्याचे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना गणेश अंकुशराव यांचेसोबत संपत सर्जे, प्रकाश मगर यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात ज्या ठिकाणावरुन इंग्रजांनी अटक केली होती. त्या ठिकाणी त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे. अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून येथील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात येतआहे.