दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण शहराचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकी गावामध्ये व परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चोरीचे प्रमाण व भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. यासाठी विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतंत्र बैठक लावून कोळकी येथे पोलीस औट पोस्ट मंजूर केलेले आहे. तरी कोळकी पोलीस औट पोस्टसाठी असणार्या जागेबाबतच्या सर्व तांत्रिक अडचणी आगामी काळामध्ये दुर करून कोळकी येथे पोलीस औट पोस्ट लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेले आहे.
कोळकी येथील पोलीस औट पोस्टच्या नियोजित जागेची पाहणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय कामठे, सदस्य विकास नाळे, अक्षय गायकवाड, कोळकी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. ए. एम. शिंदे, संजय देशमुख, उदयसिंह निंबाळकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कोळकी येथील पोलीस औट पोस्टसाठी असणाऱ्या जागेबाबत जिल्हा परिषद स्तरावर काही मंजूरी प्रस्तावित आहेत. त्या आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेमधून मंजुरी तातडीने घेऊन कोळकी येथे पोलीस औट पोस्ट सुरू करणार आहोत. यासोबतच कोळकी येथे वाढणार्या गुन्हे व घरफोडी बाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमधील अधिकार्यांना योग्य ते निर्देश देण्यात येतील, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
कोळकी येथे होणार्या औट पोस्ट मध्ये कोळकीसह बाजुच्या गावांमध्ये घडणारे गुन्हे कमी करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून कोळकी येथे औट पोस्ट नक्कीच सुरू करण्यात येणार आहेत. त्या बाबत असणार्या तांत्रिक बाबी दुर करून लवकरच कोळकी येथे औट पोस्ट कार्यान्वित होईल यात आता कसलीही शंका नाही, असे मत पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी व्यक्त केले.