सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला


स्थैर्य, सातारा, दि. 22 ऑगस्ट : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार सुरू असणार्‍या पावसाचा जोर बुधवारी दुपारनंतर कमी झाला. त्यामुळे प्रमुख धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे. तरीही सकाळी आठपर्यंतच्या 24 तासांत नवजा येथे तब्बल 387 तर महाबळेश्वरला 308 मिलिमीटर पाऊस पडला. तसेच आठ महसूल मंडलांतही अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणच्या 129 कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत होता. यामुळे पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बुधवारी सकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. यामुळे कोयना वगळता इतर प्रमुख धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे.

तर सायंकाळच्या सुमारास कोयना धरणातून एकूण 95 हजार 300 क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता. धरणाचे दरवाजे 13 फुटांवर स्थिर होते. त्यामधून 93 हजार 200 आणि पायथा वीजगृह 2 हजार 100 असा विसर्ग सुरू होता. तर कोयनेसह प्रमुख सहा धरणांतून एकूण 1 लाख 21 हजार 411 क्युसेक पाणी सोडले जात होते. यामुळे नद्या दुथडी भरून वाहत होत्या.
सहा धरणांत 143 टीएमसी पाणीसाठा..

कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता 148.74 टीएमसी आहे. धरण क्षेत्रात पाऊस असल्याने सायंकाळच्या सुमारास धरणांमध्ये 142.85 टीएमसी पाणीसाठा झाला होता. ही धरणे 96 टक्के भरली होती.

दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असणार्‍या संततधार पावसामुळे कृष्णा-कोयना नद्यांची पातळी वाढली आहे. त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. कराडचे ग्रामदैवत कृष्णाबाई मंदिरातही पाणी शिरले आहे. तर दक्षतेचा उपाय म्हणून शहरातील 21 कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. कराडला कृष्णा व कोयना नदीचा प्रीतिसंगम आहे. त्यामुळे या दोन्ही नद्यांतून येणारे पावसाचे पाणी, त्यातच कोयना धरणातून सुरू असणारा पाण्याचा विसर्ग, यामुळे नद्यांनी आपली पातळी ओलांडली आहे. शहरातील दत्त चौकातील साई मंदिराच्या आवारात, त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी ओपन जिममध्ये पाणी गेले आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या लिंगायत समाजभूमीतही पावसाचे पाणी आले आहे.


Back to top button
Don`t copy text!