स्थैर्य, फलटण : एक जणास बोलवुन आणण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन, नकार देणार्याचे घर दारुच्या नशेत पेटवून दिल्याचा प्रकार ठाकूरकी ता. फलटण येथे घडला आहे. या प्रकरणी अंकुश लाला चव्हाण रा. ठाकूरकी ता. फलटण या संशयीत आरोपीवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दिनांक २७ जुलै रोजी ठाकूरकी गावच्या हद्दीतील बोडरे वस्ती येथे संध्याकाळी पाचच्या सुमारास, अंकुश चव्हाण याने दारुच्या नशेत यशवंत जाधव यांना हनुमंत बोडरे यांना बोलावून आणायला सांगितले. परंतू जाधव यांनी बोडरे यांना बोलावून आणण्यास नकार दिला. जाधव हे बोलावण्यास गेले नाहीत याचा राग मनात धरून चव्हाण याने जाधव यांचे राहते शेडवजा घर पेटवून दिले.
या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु जाधव यांच्या घरातील संपूर्ण प्रापंचिक साहित्य, सॅमसंग कंपनीचा छोटा मोबाईल, रोख रक्कम दोन हजार रुपये, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक, रेशनिंग कार्ड व इतर कागदपत्रे जळून खाक झाले. यात त्यांचे अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सदर प्रकरणी यशवंत बाबू जाधव वय ७३ मुळ रा. ताथवडा ता. फलटण हल्ली मुक्काम बोडरे वस्ती, ठाकुरकी ता. फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारी हे करीत आहेत.