दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । अमरावती । मोर्शी तालुक्यातील बऱ्हानपूर येथील कु. आरती संजय काळे या अभियांत्रिकीच्या युवतीवर दोन दिवसापूर्वी रानडुक्करांनी हल्ला केला. या हल्ल्यात आरती जखमी झाली असून तीच्या पायाला पंधरा टाके पडले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज तीच्या घरी जाऊन तीची प्रत्यक्ष भेट घेतली. तीची आस्थेने विचारपूस करुन आर्थिक मदत केली. वैद्यकीय उपचारार्थ लागलेला संपूर्ण खर्च व मोबदला वनविभागाने तीला लवकर मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या माहिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
मोर्शीचे तहसीलदार सिध्दार्थ मोरे, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने, पदाधिकारी रमेश काळे यांच्यासह गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात सध्या शेतीची कामे सुरु आहेत. पीक पेरणीचे दिवस असल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांकडून गावांत किंवा शेतात हल्ले होणार नाही, यासाठी वनविभागाने दक्षतापूर्वक गस्ती घालाव्यात. वन्यप्राण्यांकडून मणूष्यांवर किंवा बैल, गायी, म्हैस यारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याच्या घटनांना आळा घालावा. गावातील नागरिक किंवा विद्यार्थीनीवर वन्यप्राण्यांद्वारे हल्ला ही अकस्मात घटना झाली आहे. यापूढे असे प्रसंग घडू नये म्हणून वनविभागाने जंगलाच्या बाजूने कुंपन किंवा मोठा चर खोदून वन्यप्राण्यांना गावात येण्यासाठी अटकाव करावे.
कु. आरतीला रानडुक्कराच्या हल्ल्यात पायाला दुखापत झाली असून पंधरा टाके पडलेले आहे. वनविभागाने तातडीने वैद्यकीय अहवाल प्राप्त करुन तातडीने तीला मदत उपलब्ध करुन द्यावी. तीच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार लक्षात घेता, आरतीचे मदतीचे प्रकरण तत्काळ मार्गी लावून मदत मिळवून द्यावी, असेही श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.