स्थैर्य, फलटण, दि.२ : महाराष्ट्र विधान परिषद पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातील फलटण येथे आज (मंगळवार) किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले असून पदवीधर मतदार संघात ६१.९८ % आणि शिक्षक मतदार संघात 89.88 % मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेण्यात आले असून गुरुवार दि. ३ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
फलटण तालुक्यात पदवीधर मतदार संघात एकूण ९२२२ मतदार होते त्यापैकी ५७१६ म्हणजे ६१.९८ %मतदारांनी तर शिक्षक मतदार संघात ७७२ मतदार होते त्यापैकी ६९३ म्हणजे ८९.८८ % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. पदवीधर मतदार संघात ६२ आणि शिक्षक मतदार संघात ३५ उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरले आहेत.
फलटण तालुक्यात पदवीधर मतदार संघातील मतदारांसाठी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे ७, वाठार निंबाळकर प्रा. शाळा येथे ३, निंबळक येथील प्रा. शाळा येथे ४ आणि सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल, तरडगाव येथे २ अशी एकूण १६ मतदान केंद्रावर आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. शहरातील मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र खो खो असोसिएशन अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या अड. सौ. जिजामला नाईक निंबाळकर वगैरे अनेक मान्यवरांसह, शासकीय अधिकारी, पदाधिकारी व सर्वसामान्य मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिक्षक मतदार संघात मोठा उत्साह दिसून आला. या मतदार संघातही विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापकांसह शिक्षक/शिक्षिकांनी मतदानाचा हक्क बजावला.