दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । सातारा । छत्रपती शिवराय हा एक आदराचा व प्रेरणादायी विषय आहे . त्यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या पदाची उंची ओळखून बोलायला हवे . त्यांनी आपले विधान त्वरित मागे घ्यावे असा तीव्र संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या टिटर अकौंटवरून व्यक्त केला .
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळं नव्या वादाला सुरुवात झालीय. भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केलंय. या वादग्रस्त विधानावर आता साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आपल्या रोषाला वाट करून दिली .
खासदार उदयनराजेंनी ट्विटव्दारे राज्यपालांवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केलाय. त्यामुळं शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरित मागं घ्यावं, असं आवाहन वजा इशारा उदयनराजेंनी राज्यपालांना दिलाय.