
दैनिक स्थैर्य । 12 मार्च 2025। मुंबई । विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये केलेले सर्व संकल्प येत्या पाच वर्षांत महायुतीचे सरकार पूर्ण करेल, तसेच कोणतीही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली.
अमरावती जिल्हा शिक्षक महासंघ अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेश प्रसंगी बावनकुळे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते आमदार संजय कुटे, आ. प्रवीण पोटे, आ. प्रवीण तायडे, आ. प्रतापदादा अडसड, आ. श्रीजया चव्हाण, आ. केवलराम काळे, आ. राजेश वानखेडे, चंद्रशेखर यावलकर, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
मंत्री चंद्रशेखर बानवकुळे म्हणाले, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी व्यवस्था उभारण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असून आमच्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार पुढील पाच वर्षात पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित भारताची आणि महाराष्ट्राची वाटचाल गतिमान होईल याचा विश्वास वाटल्याने या सर्वांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांच्या प्रवेशाने भाजपाला नवी ताकद मिळणार असून सर्वांच्या साथीने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांचे तसेच राज्य अर्थसंकल्पातील योजनांचे लाभ पोहोचवण्याचे लक्ष्य साध्य करायचे आहे असेही ते म्हणाले.
यावेळी अकोला जिल्हा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष नितीन नानोटे, अकोला शहर अध्यक्ष गोपाल सांगुनवेढे, वाशिम जिल्हा शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष राम देशमुख, आदिवासी राकोनकार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगलसिंग डाबेराव, गोरबंजारा संघटना संघटक प्रमोद राठोड, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुमनताई अग्रवाल, प्रीती जयस्वाल, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्याच्या काँग्रेस पदाधिकारी व एकलहरेचे सरपंच अरुण दुशिंग, शिंदे सरपंच बाजीराव जाधव, वंजारवाडी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, पेठ शहर काँग्रेस अध्यक्ष याकुबभाई शेख, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष छगन चारोस्कर, पेठ तालुका युवती अध्यक्ष रेखा भोये यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.