गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी बि -बियाणे, खत दिले बांधावर
स्थैर्य, सातारा दि. 13 : कोरोनाच्या संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जगाबरोबर देशाला आणि राज्याला झळ सोसावी लागली आहे. या मुळे अर्थ चक्र थांबले, याचा फटका शेतकऱ्यांपासून ते उद्योगपती यांनाही बसला. पहिल्या लॉकडाऊन पासून शेतकऱ्यांच्या मुलभूत गरजा भागविण्यावर शासनाने भर दिला असून शासन खंबीरपणे पाठीशी आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज केले.
पाटण तालुक्यातील गिरेवाडी येथील शिवारात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बि-बयाणे व खतांचे वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार प्रमोद यादव, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, कृषी विकास अधिकारी विनायक पवार, गिरेवाडीच्या सरपंच सुजाता शिंदे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांपासून ते उद्योगांनाही कोरोना झळ सोसावली लागली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला थोडा कालावधी लागेल. या संकटाच्या काळात शेतकरी वाचाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. शासनाने पहिल्या लॉकडाऊन पासून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर लॉकडाऊन जाहीर केला नसता तर आपल्याला फार मोठा फटका बसला असता.
कोरोनाच्या संकट काळात पाटण तालुक्यातील 21 हजार 500 कुटुंबांना धान्यांचे किट वाटप करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर ठेवणे हाच कोरोनापासून बचात करण्याचा उपाय आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन असून शेतकऱ्यांसाठी जे करावे लागेल ते शासन करीत आहे, असेही गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांनी शेवटी सांगितले.
यावेळी सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी व हुमणी किड नियंत्रण प्रात्यक्षिक यावेळी शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.