मराठा ईडब्ल्यूएस कोट्यास पात्र नसल्याचे परिपत्रक सरकारने रद्द करावे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


मराठा समाजासह इतर आर्थिक दुर्बल घटकांवर अन्याय नको : आ. शिवेंद्रसिंहराजे

स्थैर्य, सातारा, दि. ३१ : राज्य सरकारने मराठा समाजासह इतर आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या समाज घटकांना आर्थिक मागास घटकांच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचं परिपत्रक काढलं आहे. ईडब्ल्यूएस ही सवलत असून ती जातीवर नव्हे तर आर्थिक परिस्थितीवर आधारित आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समजासह इतर समाजातील आर्थिक दुर्बल घटकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हे परिपत्रक रद्द करावे, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने अतिशय चुकीच्या पद्धतीने आर्थिक मागास घटकांच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाबाबत परिपत्रक काढले आहे. यात मराठा समाजाचे विद्यार्थी या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत, असं सांगण्यात आलं आहे. कुठल्या आरक्षणात भाग घ्यायचा आणि कोणत्या आरक्षणात नाही हा राज्यात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. या परिपत्रकात जिल्हाप्रशासनाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील प्रमाणपत्र देताना संबंधित अर्जदार आरक्षित वर्गातील आहे की इतर याची खातरजमा करण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जे उमेदवार आरक्षित घटकांमधील आहेत, त्यांना राज्यशासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशासाठी असे प्रमाणपत्र न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

प्रमाणपत्र देण्यापूर्वी तहसीलदार आणि संबंधित प्राधिकरणाने उमेदवार कोणत्याही सामाजिक आरक्षण प्रकारात मोडतो की नाही हे तपासले पाहिजे कारण केंद्र व राज्य प्रमाणपत्रांचे मॉडेल वेगळे आहेत. ईडब्ल्यूएस आरक्षण जाती आधारित नाही. याचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे केवळ मराठा समाजातीलच आर्थिक दुर्बल नव्हे तर इतर सर्वच प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना ईडब्लूएसच्या सवलतींपासून वंचित राहावे लागणार आहे.  

त्यामुळे राज्य सरकारने हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे आणि मराठ्यांसह सर्वच प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांवरील अन्याय थांबवावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!