दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । मुंबई । पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण भाग व तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा –भीमा स्थिरीकरण योजनेला गती मिळाली नाही तरी या योजनेसंदर्भात शासन करीत असलेली कार्यवाही याबाबत लक्षवेधी मांडली.
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले,पावसाळ्यात कृष्णा खोऱ्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून ते भीमा खोऱ्यात आणून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दुष्काळी भागाला पुरविण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी 2004 मध्ये कृष्णा –भीमा स्थिरीकरण योजनेला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली.मात्र सन 2013 च्या कृष्णा पाणी तंटा लवाद 2 च्या निर्णयामध्ये कृष्णा खोऱ्यातील पाणी एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात वळविण्यास मनाई केलेली असून कृष्णा –भीमा स्थिरीकरणाचा प्रस्ताव नामंजूर केला आहे.कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा शासन स्तरावर फेरविचार व्हावा, असा अहवाल महामंडळ आणि शासनाकडे सादर करण्यात आला आहे.उजनी जलाशयातून गाळमिश्रीत रेती तसेच वाळू यांचे प्रमाण निश्चित करुन आणि निविदेचे निकष अद्यावत करुन गाळ काढण्याची प्रक्रिया करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.